
पणजी : मागील काही वर्षे गोव्यातील (Goa) एससी (SC) समाजाला जात प्रमाणपत्र देताना त्यावर तात्पुरते असा उल्लेख केला जात आहे. त्यामुळे समाज बांधवांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे एससी समाजाला अन्य समाजांप्रमाणेच कायमस्वरूपी जात प्रमाणपत्र द्यावे; अशी मागणी काँग्रेस (Congress) एससी विभागाचे अध्यक्ष विठू मोरजकर यांनी केली.
शनिवारी पणजीत (Panjim) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी एससी विभाग गोवा समन्वयक अश्विनी खोब्रागडे, आयुष केरकर उपस्थित होते. मोरजकर यांनी सांगितले की, यापूर्वी एससी समाजातील व्यक्तींना मामलेदार कार्यालयातून जात प्रमाणपत्र दिले जात होते. मामलेदार कायमस्वरूपी जात प्रमाणपत्र देत होते.
यामुळे समाजातील विद्यार्थी किंवा अन्य लोकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत नव्हते. मात्र नंतर या प्रक्रियेत बदल करण्यात आला. जात प्रमाणपत्र देण्याचा अधिकार समाज कल्याण खात्याला देण्यात आला. यासाठी दहा जणांची छाननी समिती स्थापन करण्यात आली होती. समिती आलेल्या अर्जांवर निर्णय देत होती.
मात्र काही कालावधीनंतर समाज कल्याण खात्याकडून हा अधिकार काढून घेतला. सध्या उपजिल्हाधिकारी जात प्रमाणपत्र देत आहेत. या प्रमाणपत्रावर खाली तात्पुरते असे लिहिले असल्याने समाजातील लोकांना त्रास होत आहे. याशिवाय सरकारने एससी, एसटी आयोग आणि एससी ओबीसी विकास महामंडळाची स्थापना केली आहे.
मात्र अद्याप या दोन्ही संस्थांवर एससी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळालेले नाही. राज्यात मागील अनेक वर्षे भाजप सरकार सत्तेवर आहे. मात्र एससी समाजाच्या समस्या सुटलेल्या नसल्याचा आरोप मोरजकर यांनी केला.
उद्या समाजाचा मेळावा
अश्विनी खोब्रागडे म्हणल्या की, गोव्यातील पेडणे मतदारसंघ एससी समाजासाठी राखीव आहे. मोपा विमानतळ, आयुष रुग्णालयात एससी समाजाला प्राधान्याने नोकऱ्या मिळणे आवश्यक आहे. एससी समाजाच्या समस्या जाणून त्यांच्यावर उपाययोजना करण्यासाठी काँग्रेसच्या पणजी कार्यालयात १ मार्च रोजी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.