कार्मिक खात्यात हजेरी लावण्याचे निर्देश; खात्यांतर्गत चौकशी सुरू राहील

पणजी: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबला लागलेल्या भीषण आग दुर्घटनेप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सिद्धी हळर्णकर आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सचिव डॉ. शर्मिला मॉन्तेरो यांचे निलंबन मागे घेण्याचे आदेश सरकारने जारी केले असून दोन्ही अधिकाऱ्यांना कार्मिक खात्यात हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
६ डिसेंबर रोजी बर्च क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात परवाने देण्याबाबत गंभीर त्रुटी असल्याचे नमूद करत अनेक अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला होता. दरम्यान, सरकारने सिद्धी हळर्णकर, डॉ. शर्मिला मॉन्तेरो यांच्यासह पंचायत सचिव रघुवीर बागकर, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वैज्ञानिक सहाय्यक चैतन्य साळगावकर आणि कनिष्ठ अभियंता विजय कानसेकर यांना निलंबित केले होते. दरम्यान, क्लबचे सह मालक अजय गुप्ता यांना ७ फेब्रुवारी, तर बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर आणि तत्कालीन सरपंच रोशन रेडकर यांना काल म्हापसा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
या दोन्ही महिला अधिकाऱ्यांचे निलंबन तांत्रिकदृष्ट्या मागे घेण्यात आले असले, तरी त्यांच्याविरोधातील खात्यांतर्गत चौकशी सुरू राहील.