फोंडा: तिस्क-फोंडा येथील कोमर्स सेंटरमध्ये असलेल्या ग्लोबल व्हिजन या चष्म्याच्या दुकानात शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शेजारील अन्य दुकानांतील इलेक्ट्रिक यंत्रे देखील खराब झाली आहेत. दरम्यान फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. आग लागल्याने दुकान मालकाला मोठे नुकसान सोसावे लागले आहे.
प्राप्त माहितीनुसार शनिवारी सकाळी ग्लोबल व्हिजन या चष्म्याच्या दुकानातुन अचानक धूर येऊ लागला. शेजारील दुकानदारांनी त्वरित फोंडा अग्निशमन दलाच्या कार्यालयात माहिती दिल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. तसेच शेजारी असलेल्या अन्य दुकानात तसेच नजीकच्या एका बँकेच्या कार्यलयातील संगणक व लॅपटॉपचे नुकसान झाले.