मूर्तीच्या मागील बाजूस ‘त्या’ तीन ओळी : संशोधन करण्यास वाव : इतिहास संशोधक डॉ. फळगावकर

पणजी : गोव्यातील पिळगाव, डिचोली येथे सोळाव्या शतकातील (16 Century) नागरी कोकणीतील पहिला शिलालेख सापडला आहे. सोळाव्या शतकातील श्री कालभैरवाच्या मूर्तीच्या मागील बाजूस तीन ओळींचा शिलालेख आहे. सोळाव्या शतकातील नागरी कोकणीतील पहिला शिलालेख असल्याचे इतिहास संशोधक तथा संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. रोहित फळगावकर यांचे म्हणणे आहे. शिलालेख सापडल्याने गोव्यात मूर्ती विषयक संशोधनास वाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. रोहित फळगावकर यांनी सांगितले की, डिचोली तालुक्यातील वरगाव-पिळगाव येथील श्री चामुंडेश्वरी मंदिरातील (Temple) तलावात ही मूर्ती सापडली. त्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष तुषार टोपले व मंदिराच्या इतर पदाधिकारी यांच्याकडून ही मूर्ती मिळवली. मंदिरात झालेल्या नव्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेवेळी या मूर्तीचे तलावात विसर्जन करण्यात आले होते. या शिलालेखात नागरी कोकणीत असलेल्या तीन ओळी आहेत. मात्र, त्यावरील शब्द अस्पष्ट दिसत असल्याने वाचणे कठीण बनले आहे. मात्र, या शिलालेखाविषयी अधिक संशोधन करणे शक्य असल्याचे फळगावकर यांनी सांगितले.

कोकणीशी निगडीत शब्द
श्री कालभैरवाची जी मूर्ती सापडली आहे. त्यावरील मागील तीन ओळींमध्ये ‘गोंयें सिंहासमी, गोंए व गोंयांत चंडिका’ असे शब्द आहेत. हे शब्द कोकणी भाषेशी जवळकीक साधणारे आहेत. ‘फाल्गुण’ शब्द ही कोकणीला जवळ असल्याचे डॉ. फळगावकर यांनी स्पष्ट केले. भारतीय पुराभिलेख सर्वेक्षण खात्याने यावर शिक्कामोर्तब केले आहेत. खात्याच्या अॅप्रीग्राफिस्ट यांनी या लेखाचे वाचन केल्यानंतर हा लेख कोकणी असल्याचे स्पष्ट केले आहे.

सापडलेला पहिला ज्ञात कोकणी शिलालेख
गोव्यात आतापर्यंत सापडलेल्या शिलालेखांवर, ‘गोवे, गोपक’ असे शब्द दिसले आहेत. मात्र, गोव्यात पिळगाव येथे सापडलेला पहिला ज्ञात कोकणी (Konkani) शिलालेख आहे. सापडलेली ही मूर्ती १५७९ बनवण्यात आली व १५८३ साली स्थापित करण्यात आली असावी, असा अंदाज ही इतिहास संशोधक डॉ. रोहित फळगावकर यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात प्रुडंटच्या गोवा स्टोरीस यूट्यूब चॅनल व संदेश प्रभुदेसाई यांच्या गोवा न्यूज डॉट कॉमवर अधिक माहिती आहे.
