पोलिसांकडून गुन्हा नोंद

पणजी : गोव्यातील (Goa) मिरामार (Miramar) येथील एका वसाहतीत ट्रकमध्ये (Truck) भारत पेट्रोलियमच्या (Bharat Petroleum) गॅस सिलिंडरमधून (Gas Cylinder) गॅस चोरी करताना दोघांना स्थानिकांनी पकडले. त्यानंतर बिंग फुटल्याचे समजताच वाहन व सर्व साहित्य टाकून दोघेही तेथून पळाले.
हॉटेलमध्ये (Hotel) पुरवठा केल्या जात असलेल्या १८०० रुपयांच्या सिलिंडरमधून गॅस चोरी केली जात होती. याप्रकरणी पोलीसांत तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, गेली दोन वर्षे एक ट्रक त्याठिकाणी ठेवण्यात येत होता. चालक व क्लीनरला विचारल्यास हॉटेलमध्ये डिलीवरी करण्यासाठी थांबतो व बिल देण्यासाठी वेळ लागत असल्याची सबब सांगितली जात होती.
संशयावरून व्हिडीओ काढला असता त्यात भरलेला व रिकामा सिलिंडर आडवा होता व छोट्या वायरने भरलेल्या सिलिंडरमधून गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये घेतला जात होता. गॅस काढून सिलिंडरला पिवळे सील पुन्हा चिकटवले जात होते. हा प्रकार पाहून वस्तीतील एकाने चालक व क्लीनरला खडसावले असता, चालक थातूरमातूर उत्तरे देऊ लागला.
पोलिसांना फोन केल्यानंतर सिलिंडर भरलेला ट्रक व अर्धवट भरलेला सिलिंडर, इतर साहित्य तेथेच टाकून पळून गेले. गॅस चोरीसाठी वापरली जाणारी वायर त्याठिकाणी असलेल्या गवतात टाकली.
गॅसचा वास सर्वत्र पसरला होता व नुसती काडी तरी पेटली असती तर दिल्लीत झाला तसा स्फोट झाला असता, अशी माहिती त्याठिकाणी असलेल्यांनी दिली. आणि काही प्रश्न उपस्थित केले.
ते म्हणजे गॅस सिलिंडरची गाडी दोन ते तीन तास एकाच ठिकाणी ठेवली जात असूनही गॅस एजंसी पाठपुरावा कसा करत नाही? कंपनीचे सिल करण्यासाठी लागणारे स्टिकर चालकाकडे कसे? वजनमाप खाते कुठे आहे? ह्याला जबाबदार कोण? यामध्ये गॅस एजंसी असलेल्याचा रोल काय? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे दुकान प्रथम बंद करावे व या रॅकेटचा पूर्ण तपास करावा, अशी मागणी एकूण हा प्रकार उघडकीस आणलेल्यांनी केला आहे.