आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल : मुख्यमंत्री डॉ. सावंत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळेल : मुख्यमंत्री डॉ. सावंत

मडगाव: मागील जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने उत्तर गोव्यात २२ आणि दक्षिण गोव्यात १४ जागा जिंकल्या होत्या. आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार पूर्ण बहुमतावर निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

दक्षिण गोवा भाजप कार्यालयाच्या नजीक मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री रमेश तवडकर, आमदार उल्हास तुयेकर यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी बिहार निवडणुकीतील एनडीएच्या विजयाचा जल्लोष केला.

यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, बिहारच्या मतदारांनी जंगलराज आणि गुंडाराज नाकारून विकासाला मतदान केलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या निवडणुका पार पडल्या, यात एनडीएच्या उमेदवारांनी २०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. विरोधकांना क्लीन स्वीप देत एनडीएने बहुमत मिळवले आहे.

ते पुढे म्हणाले की, काही पक्ष केवळ जाती आणि धर्माच्या नावावर मते मिळवण्याचा प्रयत्न करतात, मात्र भाजपचे डबल इंजिन सरकार केवळ विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका जिंकत आहे. यापुढील निवडणुका जाती आणि धर्माच्या आधारावर लढल्या जाणार नाहीत. देशात सुमारे २० पेक्षा जास्त राज्यांत एनडीएची सरकारे आहेत. विकसित भारत २०२७ साठी काम केले जात आहे. बिहारच्या जनतेप्रमाणेच आगामी जिल्हा पंचायत आणि पालिका निवडणुकांत गोव्यातील जनता भाजपसोबत राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा