मॅच फिक्सिंगप्रकरणी १४ फुटबॉलपटूंवर आरोपपत्र

जीएफएच्या एथिक्स कमिटीची कारवाई : खेळाडूंना उत्तरासाठी दहा दिवसांची मुदत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
15 mins ago
मॅच फिक्सिंगप्रकरणी १४ फुटबॉलपटूंवर आरोपपत्र

पणजी : गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) एथिक्स कमिटीने मॅच फिक्सिंगच्या आरोपावरून १४ खेळाडूंना २८८ पानांचे आरोपपत्र बजावले आहे. यातील बहुतांश खेळाडू हे शापोरा युवक संघाचे माजी खेळाडू आहेत. या प्रकरणाच्या तपासाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस शापोरा युवक संघाने मॅच फिक्सिंगच्या कथित आरोपावरून आपल्या संघातील ९ खेळाडूंना बडतर्फ केले होते. त्यानंतर क्लबने या प्रकरणी जीएफएकडे तक्रार केली आणि गोवा प्रोफेशनल लीग २०२५-२६ हंगामातील कथित मॅच फिक्सिंगबाबत म्हापसा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला. या तक्रारीची तत्काळ दखल घेत गोवा फुटबॉल असोसिएशनने निवृत्त पोलीस उपअधीक्षक संदेश टी. चोडणकर यांची ‘इंटिग्रिटी ऑफिसर’ म्हणून नियुक्ती करून त्यांच्यामार्फत तपास केला.
इंटिग्रिटी ऑफिसरने आपला तपास अहवाल जीएफए एथिक्स कमिटीला सादर केला. त्यानंतर कमिटीने रोहन कृष्ण पेडणेकर, आकाश अमृत कुडणेकर, आकाश सानदी, भास्कर जळमी, कृष्णनाथ शिरोडकर, विनायक राणे, चैतन दाभोळकर, सच्चिदानंद सातेलकर, अमन गोवेकर, मिनश कुंकळकर, सतीश काणकोणकर, मौझान शेख, सुरज हळदणकर आणि रोनाल्डो ऑलिव्हेरा या १४ खेळाडूंना आरोपपत्र बजावले आहे. त्यांना या आरोपांवर उत्तर देण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
कठोर कारवाईचा इशारा
या प्रकरणातील शिक्षेवर चर्चा करण्यासाठी मार्चच्या सुरुवातीला जीएफए एथिक्स कमिटीच्या सदस्यांची बैठक होणार आहे. २०२२ मध्ये मी जीएफएची सूत्रे हाती घेतली, तेव्हा गोवन फुटबॉलमधून ही कीड नष्ट करून व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन मी क्लबना दिले होते. आम्ही ते ध्येय साध्य करण्याच्या मार्गावर आहोत. यात सामील असलेल्या सर्वांवर जीएफए कार्यकारी समिती कठोर कारवाई करेल, असे गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कायतानो फर्नांडिस यांनी सांगितले.