आजपासून ‘सुपर ८’चा थरार

पहिल्या सामन्यात पाकिस्तान-न्यूझीलंड आमने-सामने

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
9 mins ago
आजपासून ‘सुपर ८’चा थरार

कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या गट टप्प्याची सांगता होताच आता सर्वांचे लक्ष सुपर ८ फेरीकडे लागले आहे. २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या टप्प्यातील पहिलाच सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. हा महत्त्वाचा सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघांनी गट टप्प्यात तीन विजय आणि एक पराभवासह दमदार कामगिरी करत पुढील फेरी गाठली आहे.
पाकिस्तानसाठी, साहिबजादा फरहानने आतापर्यंत फलंदाजीने चांगली छाप पाडली आहे. फरहानने चार सामन्यांमध्ये १६४ च्या स्ट्राईक रेटने २२० धावा फटकवल्या आहेत. त्याने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात शतक झळकवले. तथापि, पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय असा आहे की, फरहानशिवाय संघातील इतर फलंदाजांना आतापर्यंत स्पर्धेत प्रभावी कामगिरी करण्यात यश आले नाही.पाकिस्तानच्या या खेळाडूंवर असेल लक्ष्यन्यूझीलंडविरुद्ध सॅम अयुब, बाबर आझम आणि कर्णधार सलमान आगा यांच्याकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. जर पाकिस्तान संघाला न्यूझीलंडच्या मजबूत गोलंदाजीविरुद्ध चांगली कामगिरी करायची असेल तर संघाच्या फलंदाजांना अधिक जबाबदारीने खेळावे लागणार आहे. पहिल्या फेरीत शादाब खानने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये आपली छाप पाडली होती.
दरम्यान, उस्मान तारिकने विकेट घेणे आणि किफायतशीर कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केले आहे. तसेच या सामन्यातही पाकिस्तान अधिक फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवू शकतो. कारण हा निर्णय पाकिस्तानच्या बाजूने काम करत आहे.
दुसरीकडे, न्यूझीलंडने गट टप्प्यात शानदार कामगिरी बाजवली आहे. या संघात टिम सेफर्ट धावा काढणारा फलंदाज आहे आणि स्पर्धेत संघाचा आघाडीचा धावा काढणारा खेळाडू म्हणून चांगली कामगिरी केली आहे. सेफर्टने चार सामन्यांमध्ये १७३ धावा केल्या आहेत. तर ग्लेन फिलिप्सनेही कॅनडाविरुद्ध ३६ चेंडूत ७६ धावा करत फॉर्ममध्ये परतल्याचे दाखवून दिले आहे. गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर, मॅट हेन्री आणि जेकब डफी यांच्या जोडीने सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. आर. प्रेमादासा स्टेडियमवर मिचेल सँटनर पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी अडचणीचा ठरू शकतो.
कोलंबो येथील आर. प्रेमदासा खेळपट्टी संथ असते. फिरकीपटूंना या खेळपट्टीवरून बरीच मदत मिळत आली आहे. तसेच, चेंडू बॅटवर येण्यास अडचण येते. म्हणूनच कोलंबोच्या या मैदानावर जास्त धावसंख्या करणे कठीण होऊन बसते. या मैदानावर सरासरी पहिल्या डावात १४४ धावा आहेत, तर सरासरी दुसऱ्या डावात १२९ धावांचा रेकॉर्ड आहे.
पावसाचा अंदाज
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यावर पावसाच्या धोक्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान मैदानावर काळे ढग येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची शक्यता अंदाजे ७५ टक्के आहे.
हेड-टू-हेड रेकॉर्ड
पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण ४९ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेवळवण्यात आले आहेत. यामध्ये पाकिस्तानने २४ सामने आपल्या नावावर केले तर न्यूझीलंडने २३ सामन्यात विजय मिळवला. यामुळे दोन्ही संघांमधील सुपर ८ सामना चांगलाच रोमांचक होण्याची शक्यता आहे.
सुपर ८ मध्ये १२ सामने
सुपर८ स्टेजमध्ये ४-४ संघांचे २ गट तयार होतील. प्रत्येक संघ आपल्या गटात एकमेकांविरुद्ध ३-३ सामने खेळेल. म्हणजे एका गटात ६ सामने असतील. अशा प्रकारे दोन्ही गट मिळून १२ सामने खेळले जातील. दोन्ही गटांतील प्रत्येकी २-२ अव्वल संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. सुपर ८ स्टेजमध्ये २२ आणि २६ फेब्रुवारी तसेच १ मार्च रोजी प्रत्येकी २-२ सामने खेळले जातील. २० ते २८ फेब्रुवारीपर्यंत उर्वरित दिवसांमध्ये १-१ सामनाच होईल. ४ मार्च रोजी पहिली सेमीफायनल होईल, तर ५ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर दुसरी सेमीफायनल खेळला जाईल. हे सामने जिंकणारे संघ ८ मार्च रोजी फायनलमध्ये भिडतील. जर पाकिस्तानने नॉकआउट फेरीत प्रवेश केला, तर त्याचे सर्व सामने कोलंबोमध्ये होतील.