नीट परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून कर्नाटकात विद्यार्थिनीची आत्महत्या

१२ दिवसांत ५ विद्यार्थ्यांचा बळी : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय शांत बसणार नाही : राहुल गांधी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
24th May, 11:09 pm
नीट परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून कर्नाटकात विद्यार्थिनीची आत्महत्या

बंगळुरू : नीट-यूजी परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर अत्यंत गंभीर आणि जीवघेणा परिणाम होताना दिसत आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथे भाग्यलक्ष्मी नावाच्या १८ वर्षीय नीट परीक्षार्थी विद्यार्थिनीने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली. विशेष म्हणजे, परीक्षा रद्द झाल्याच्या गेल्या १२ दिवसांतील देशातील ही पाचवी आत्महत्या आहे. यावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या प्रचंड नैराश्याचे चित्र समोर आले असून, या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरणही कमालीचे तापले आहे.
कर्नाटकातील कलबुर्गी येथील भाग्यलक्ष्मी या विद्यार्थिनीने नीट परीक्षा दिली होती. ती अभ्यासात अत्यंत हुशार होती आणि तिने नुकत्याच झालेल्या १२ वीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले होते. नीट परीक्षेतही तिला चांगल्या गुणांची अपेक्षा होती. तिचे वडील राजशेखर यांनी सांगितले की, कुटुंबात कोणतीही समस्या नव्हती, परंतु परीक्षा रद्द झाल्यापासून ती दबावाखाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही.
नीट-यूजी परीक्षा ३ मे रोजी देशभरात घेण्यात आली होती. मात्र, पेपर लीकचे गंभीर आरोप झाल्यानंतर १२ मे रोजी ही परीक्षा अधिकृतपणे रद्द करण्यात आली. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) आता २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. या अनिश्चिततेमुळे गेल्या १२ दिवसांत ५ निष्पाप विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
या दुर्दैवी घटनांनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले, जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत आणि ‘नीट’ सारखे पेपर लीक रोखण्यासाठी एक अभेद्य, दोषरहित व्यवस्था तयार केली जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आपल्या देशातील तरुण आणि त्यांच्या भविष्याची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे.
मुख्य आरोपी शुभम खैरनार ६ जूनपर्यंत कोठडीत
नीट-यूजी २०२६ पेपर लीक प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम खैरनार याला रविवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सीबीआयने यापूर्वी खैरनार आणि इतर पाच जणांना सात दिवसांच्या कोठडीत घेतले होते, ज्याला नंतर आणखी पाच दिवस वाढवण्यात आले होते. हा पेपर आणखी कोणी कोणी विकत घेतला, याचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ज्ञ आणि सीबीआयचे पथक तपास करत आहे. आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर (अहमदनगर) येथून एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा