
पणजी: २००९ मधील कॅसिनो मारहाण प्रकरण आणि २०२४ मधील सुभाष वेलिंगकर यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणात न्यायालयात हजर न राहिल्याने माजी मंत्री मिकी पाशेको (Ex-minister Mickky Pacheco) यांच्याविरुद्ध मडगाव प्रथमवर्ग न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
२००९ मध्ये एका कॅसिनोमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात पाशेको यांच्यावर कोलवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याशिवाय २०२४ मध्ये सुभाष वेलिंगकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणीही त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा नोंद आहे. दोन्ही प्रकरणांची सुनावणी मडगाव प्रथमवर्ग न्यायालयात सुरू आहे. (JMFC Court, Margao)
गेल्या काही तारखांना न्यायालयाने वारंवार समन्स बजावूनही मिकी पाशेको सुनावणीस गैरहजर राहिले. त्यांनी कोणतेही ठोस कारण दिले नाही किंवा गैरहजेरी माफ करण्यासाठी अर्जही केला नाही. त्यामुळे सरकारी वकिलांनी त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्याची मागणी केली.
दोन्ही प्रकरणांतील तथ्ये व पाशेको यांची अनुपस्थिती लक्षात घेऊन मडगाव प्रथमवर्ग न्यायालयाने मंगळवारी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश दिला.
आता पोलिसांना माजी मंत्र्याला अटक करून न्यायालयात हजर करावे लागणार आहे. वॉरंट बजावल्यानंतर पाशेको यांनी स्वतःहून न्यायालयात हजर होऊन जामीनासाठी अर्ज केल्यास न्यायालय निर्णय घेईल. अन्यथा त्यांना कोठडीत ठेवले जाऊ शकते.
एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत न्यायालयीन प्रक्रियेला दाद न दिल्याने मिकी पाशेको यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलीस पुढील कारवाईच्या तयारीत असून, वॉरंटची अंमलबजावणी लवकरच होण्याची शक्यता आहे.