निवडणूक जवळ आली की अळंब्यांसारखे पत्रकार तयार होतात : मुख्यमंत्री

‘गुज’च्या पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
निवडणूक जवळ आली की अळंब्यांसारखे पत्रकार तयार होतात : मुख्यमंत्री

पणजीः  निवडणूक जवळ आली की अळंबी उगवावी तसे पत्रकार तयार होतात. मोबाईल घेऊन फिरण्याऐवजी मुख्य प्रवाहात यावे. गुजने अभ्यासक्रम सुरू करावा आणि या माध्यमातून पत्रकार तयार करावेत. सरकार हवा तो पाठिंबा देण्यास तयार आहे, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chieg Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिली आहे. 

गोवा श्रमीक पत्रकार संघटनेचे (गुज) (Guj) पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. पणजीतील इन्स्टीट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो, राजदीप बिल्डर्सचे चेअरमन राजेश तारकर, पंचामृत उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक जंबू होसमानी आणि गुजचे अध्यक्ष राजतिलक नाईक उपस्थित होते.  

यावेळी गोवन वार्ताचे दक्षिण गोवा ब्युरो चिफ अजय लाड आणि क्रीडा पत्रकार सचिन दळवी यांना आमदार मायकल लोबो यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात आला. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे आणि पत्रकारांनी आपली पत्रकारिता  पोटतिडकीने करावी, असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले. 

निवडणुकीला दोन महिने असताना काहीजण अळंब्यासारखे पत्रकार म्हणून उगवतात आणि निवडणूक संपल्यानंतर आपल्या दुसऱ्या कामधंद्यात मग्न होतात. पत्रकारिता क्षेत्रातील मोठे प्लॅयर आणि इंडस्ट्रीने यावर नियंत्रण आणायला हवे. कोणीही मोबाईल घेऊन पत्रकार होतो आणि भाषणे करतो. सर्वांना विश्वासात घेऊन या गोष्टी जाग्यावर घालायला हव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जर हे आताच जाग्यावर घातले नाही तर पत्रकारितेला आणि राजकारणाला घातक ठरणार.  जे नवे चांगले पत्रकार आणि जे स्थायिक झालेले पत्रकार आहेत; त्यांचे जीवन कठीण होणार. त्यासाठी पत्रकारांची चाचपणी करून यादी द्यावी आणि नंतर जे लोक या यादीत नाहीत; त्यांना बाजूला ठेवण्यास आम्ही आमदारांना सांगणार, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

उगाच मोबाईल घेऊन पत्रकारिता करू नका. यंत्रणेत आत या, तुम्हाला मदत करण्यास तयार आहोत. यासाठी गुजने एक सहा महिन्यांचा पत्रकारिता अभ्यासक्रम तयार करावा. कौशल्य विकास संचालनालयामार्फत याचा आराखडा तयार करण्यास सांगतो. भविष्यात जे पत्रकार येणार ते या यंत्रणेतून यावेत, जेणेकरून दीर्घकाळासाठी पत्रकारिता क्षेत्रात राहणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

हेही वाचा