सासष्टी : रुमडामळ येथे एका शाळेतील क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनावेळी पोलीस अधीक्षकांना दुखापत

गॅसने भरलेल्या फुग्यांना लागली आग; प्रथमोपचाराअंती पोलीस अधीक्षक (ट्रेनिंग) सुचिता देसाईंना डिस्चार्ज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th November, 04:25 pm
सासष्टी : रुमडामळ येथे एका शाळेतील क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनावेळी पोलीस अधीक्षकांना दुखापत

मडगाव : रुमडामळ पंचायत मैदानावर शनिवारी एका शाळेचा वार्षिक क्रीडा दिवस साजरा केला जात असताना उद्घाटनावेळी गॅसने भरलेल्या फुग्यांना आग लागली. यावेळी उद्घाटनासाठी उपस्थित पोलीस अधीक्षक (ट्रेनिंग) सुचेता देसाई यांना दुखापत झाली. इस्पितळात प्राथमिक उपचाराअंती त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.




मिळालेल्या माहितीनुसार, रुमडामळ येथील एका शाळेचा वार्षिक क्रीडा दिन ३० रोजी साजरा करण्यात येत होता. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई हे उपस्थित राहणार होते. मात्र, काही कारणास्तव त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. याच कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक (ट्रेनिंग सेल) सुचेता देसाई या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी क्रीडा मशाल पेटवण्यात आली. त्यानंतर फुगे आकाशात सोडून क्रीडा दिनाचा शुभारंभ केला जाणार होता.




पोलीस अधीक्षक सुचेता देसाई यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असतानाच फुग्यांना आग लागली. यात गॅसने भरलेल्या फुग्यांचा स्फोट होउन मोठी आग पेटली. यात पोलीस अधीक्षक सुचेता देसाई यांच्या चेहर्‍याकडे व डोक्याला थोडी दुखापत झाली. याशिवाय व्यासपीठावर उपस्थित इतरही मान्यवरांना दुखापत झाली आहे. यानंतर पोलिस अधीक्षकांना तत्काळ खासगी इस्पितळात नेण्यात आले. त्यांच्यावर प्रथमोपचाराअंती त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, सदर क्रीडा स्पर्धेच्या  आयोजकांशी संपर्क साधला असता, अशाप्रकारची घटना घडलेली आहे. मात्र फार मोठी दुर्घटना घडलेली नाही असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा