कोलवाळ तुरुंग उपअधीक्षक, आयआरबीचा एएसआय निलंबित

तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी : एका महिन्यातील दुसरी घटना


04th February, 11:34 pm
कोलवाळ तुरुंग उपअधीक्षक, आयआरबीचा एएसआय निलंबित

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कोलवाळ कारागृहात तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करण्यात सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाल्यामुळे तुरुंग प्रशासनाने उपअधीक्षक कृष्णा उसगावकर, तर भारतीय राखीव दलाने (आयआरबी) साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूरज तोरसकर यांना सेवेतून निलंबित केले. दरम्यान, उसगावकर याला तिसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, ३० जानेवारी रोजी निलंबित साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूरज तोरसकर हा सेवा बजावण्यासाठी कारागृहात जात होता. त्यावेळी कारागृहातील प्रवेशद्वारावरील फ्रिस्किंग खोलीत त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे तंबाखूजन्य पदार्थ सापडले. हा प्रकार फ्रिस्किंग खोलीतील आयआरबी पोलिसांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदशर्नास आणून दिला. तोरसकर याची चौकशी केली असता, त्याने तुरुंग उपअधीक्षक कृष्णा उसगावकर याच्या सूचनेनुसार तंबाखूजन्य पदार्थ आणल्याची माहिती दिली. या संदर्भात त्यावेळी कारागृहात सेवा बजावत असलेल्या आयआरबीच्या उपनिरीक्षकाने तुरुंग प्रशासन आणि आयआरबी मुख्यालयाला या घटनेची माहिती दिली. कारागृहाकडून अहवाल मिळाल्यानंतर तुरुंग महानिरीक्षकांनी मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी आदेश जारी करून तुरुंग उपअधीक्षक कृष्णा उसगावकर याला सेवेतून निलंबित केले. आयआरबीचे कमांडमेंट धर्मेश आंगले यांनी साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूरज तोरसकर याला सेवेतून निलंबित केले.
याच कारणासाठी महिन्याभरापूर्वीच एकाचे झाले निलंबन
२९ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८ वा. तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करताना रंगेहाथ पकडलेल्या नवदीत पावणे या प्रोबेशनवरील पोलीस कॉन्स्टेबलला ३ जानेवारी २०२५ रोजी पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच आता तुरुंग उपअधीक्षक कृष्णा उसगावकर आणि आयआरबीचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूरज तोरसकर या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे तुरुंगात तंबाखूजन्य पदार्थ तसेच इतर वस्तूची सर्रास तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.
उसगावकरचे यापूर्वी दोन वेळा झाले निलंबन
तुरुंग उपअधीक्षक कृष्णा उसगावकर याला तिसऱ्यांदा निलंबित १० आॅक्टोबर २०१० रोजी सडा-वास्को येथील उपजिल्हा कारागृहातील कैद्यांना कोलवाळ तुरुंगात स्थलांतर करण्यात आले होते. त्यावेळी कैद्यांना मारहाण झाली होती. तुरुंग कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी कृष्णा उसगावकर याच्यासह इतर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सेवेत रुजू करण्यात आले.
२४ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रशासनाने कोलवाळ कारागृहात छापा टाकला होता. त्यावेळी कारागृहात अमलीपदार्थ आणि इतर प्रतिबंधक वस्तू सापडल्या होता. २५ ऑक्टोबर २०१९ रोजी कृष्णा उसगावकर याच्यासह इतर कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्याला ८ मे २०२० रोजी पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले. आता कृष्णा उसगावकर याला तिसऱ्यांदा निलंबित केले आहे.