पणजी : देशातील आणि राज्यातील कुशल कामगारांना किमान मासिक ३५ हजार रुपये वेतन द्यावे अशी मागणी अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे (आयटक) संघटनेचे अध्यक्ष ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केली. गुरुवारी जागतिक कामगार दिनानिमित्त पणजीत आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ॲड. सुहास नाईक, राजू मंगेशकर, प्रसन्ना उटगी व राज्यभरातील कामगार उपस्थित होते. यावेळी सरकारकडे विविध २४ मागण्या करण्यात आल्या.
फोन्सेका म्हणाले की, केंद्र सरकार कामगार विरोधी आहे. सरकार भांडवलदारांच्या फायद्याचे आणि कामगारांवर अन्याय करणारे कायदे आणत आहे. केंद्राने कामगार विरोधी चार काळे कायदे त्वरित मागे घेतले पाहिजेत. देशात बेरोजगारी वाढत आहे. संप केल्यावर कामगारांना काढून टाकण्यात येते किंवा दूर ठिकाणी बदली करण्यात येते. संघटनेतर्फे आम्ही या गोष्टींचा निषेध करतो. कामगारांना आपल्या हक्कासाठी लढण्याचा अधिकार आहे.
ते म्हणाले, सामान्य जनतेसह कामगारांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहे. अशावेळी कामगारांचे किमान वेतन वाढणे आवश्यक आहे. अकुशल कामगारांना महिन्याला २६ वेतन व १० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणे आवश्यक आहे. तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारास किमान हजार रुपये देणे गरजेचे आहे. सरकारने टॅक्सी, बस चालक मच्छीमार, पर्यटनाशी निगडीत अन्य स्थानिक व्यावसायिकांचे हित सांभाळले पाहिजे.
एस्मा रद्द करावा
सरकारने फार्मास्युटिकल कंपनीमधील संपावर जाण्याऱ्या कामगारांविरोधात काढलेला एस्माचा आदेश रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पंचायत, गोवा डेअरी, अंगणवाडी व पूर्व प्राथमिक शिक्षक आणि मदतनीस यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, एचबीए भत्ता लागू करणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.