खासगी क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांविषयी मुख्यमंत्र्याची स्पष्ट भूमिका
पणजी : येथे कामगार दिनाच्या निमित्ताने आयोजित श्रम गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खासगी क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांविषयी स्पष्ट भूमिका मांडली. कोणत्याही फार्मास्युटिकल, हॉस्पिटेलिटी किंवा इतर खासगी आस्थापनांतील कामगारांचे शोषण सरकार कदापी खपवून घेणार नाही, असे ठाम विधान त्यांनी केले. कामगारांनी आपल्या समस्यांसाठी आंदोलने न करता थेट सरकारकडे संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बांधकाम कामगार कल्याण निधीत २३० कोटी रुपये उपलब्ध असून, इतर क्षेत्रांतील कामगारांसाठी स्वतंत्र निधी स्थापन करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या योजनेत लवकरच व्यापक सुधारणा करून अधिकाधिक कामगारांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कामगारांना प्रॉव्हिडंट फंड, ईएसआय आणि इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी डिचोली येथे उभारण्यात येत असलेल्या ईएसआय हॉस्पिटलचा आणि सांगयात प्रस्तावित नव्या रुग्णालयाचा उल्लेख केला. ईएसआय योजनेंतर्गत कामगारांना २० लाखांपर्यंत उपचाराची सुविधा मिळू शकते, त्यामुळे खासगी हॉस्पिटलच्या खर्चापासून दिलासा मिळू शकतो, असे ते म्हणाले.
डॉ. सावंत यांनी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना, आयुष्मान भारत, आभा कार्ड आणि ‘वन नेशन वन रेशन’ यासारख्या योजनांचाही लाभ कामगारांना मिळवून देण्यावर भर दिला. बांधकाम कामगारांनी तीन महिने काम केले असल्यास हाउसिंग ॲडव्हान्स योजनेचा लाभ मिळवता येतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ‘ई-श्रम कार्ड’ अनिवार्य असल्याचे सांगत, अपघाताच्या स्थितीत त्याअंतर्गत आर्थिक मदतीची तरतूद आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. आयडीसी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकारतर्फे लवकरच बससेवा सुरू करण्यात येणार असून, वेर्णा औद्योगिक वसाहतीत महिला कामगारांसाठी हॉस्टेल सुरू करण्याचाही विचार असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोमंतकीय तरुणांनी प्लंबिंग, इलेक्ट्रीशियनसारख्या क्षेत्रात कंत्राटदार म्हणून स्वतःची कामे सुरू करावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कामगार कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून, योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सरकारकडून असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमात केला.