पेडणे : अग्निशामक दलाकडून आगरवाडा येथील विहिरीत पडलेल्या दोन रेड्यांना जीवदान

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
6 hours ago
पेडणे : अग्निशामक दलाकडून आगरवाडा येथील विहिरीत पडलेल्या दोन रेड्यांना जीवदान

पेडणे : येथील आगरवाडा येथील एका विहिरीत पडलेल्या दोन रेड्यांना पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळेवर कारवाई करत सुखरूप बाहेर काढून जीवडान दिले. 

ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.  विहिरीत दोन रेडे पडल्याचे आगरवाडा येथील रहिवासी आनंद नाईक यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्वरित स्थानिक पंच आणि माजी सरपंच सचिन राऊत यांना माहिती दिली. राऊत यांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधताच, पेडणे अग्निशामक केंद्राचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल झाले.

दोरखंडाच्या साहाय्याने जवळपास २५ फूट खोल विहिरीत उतरून जवानांनी दोन्ही रेड्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. प्राथमिक माहितीनुसार, हे रेडे आगरवाडा येथील नसून बाहेरील गावातून आलेले असावेत. बुधवारी रात्री उशिरा ते विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या बचावकार्यात स्थानिक पंच सचिन राऊत, अँथनी फर्नांडिस यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी मदत केली. पेडणे अग्निशामक दलाचे सहाय्यक अधिकारी सुनील देसाई यांच्या नेतृत्वाखाली ड्रायव्हर माहिल मोरजकर, फायर फायटर आशीर्वाद गाड, तेजस आरोंदेकर, विराज किन्लेकर, श्रीनेश कोरखणकर यांनी विशेष मेहनत घेतली.

हेही वाचा