पणजी : पिर्ण-बार्देश येथील अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये तब्बल ११ कोटी २८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने सोसायटीच्या माजी संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतलेल्या सात माजी संचालकांचे अर्ज मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.
या प्रकरणी प्रधान जिल्हा न्यायाधीश इर्शाद आगा यांनी दिलेल्या निर्णयात दिगंबर परब, मोहनदास देसाई, प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, कृष्णा हळर्णकर, प्रकाश ए. नाईक आणि प्रकाश एन. कांदोळकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जांना नकार देण्यात आला आहे.
सदर फसवणुकीबाबत गुंतवणूकदारांनी सुरुवातीला सोसायटीच्या प्रशासक आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. मात्र कारवाई न झाल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासक समिती स्थापन करण्यात आली. प्रशासक समितीचे अध्यक्ष मंगेश फडते यांनी १४ जुलै २०२३ पूर्वीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईओसीमध्ये तक्रार दाखल केली होती.
तक्रारीत माजी संचालकांनी एकमेकांच्या संगनमताने बनावट कागदपत्रांद्वारे बनावट कर्ज दाखवून, निधीचा अपहार व वैयक्तिक खात्यांमध्ये हस्तांतरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ठेवीदारांचे पैसे परत करण्यात संचालक मंडळ अपयशी ठरल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी डिचोलीचे रवींद्र नाईक, दिगंबर परब, कुडचडेचे मोहनदास देसाई, श्रद्धा नाईक (पिर्ण), प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, प्रकाश ए. नाईक, कृष्णा हळर्णकर (सिरसई), चंद्रशेखर बर्वे (अस्नोडा), प्रकाश कांदोळकर (पार्से-पेडणे) आणि भारत परब (अस्नोडा) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र काही गुंतवणूकदारांनी त्याला आक्षेप घेत न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केल्या. सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले.