मंत्र्यांचे वाद मात्र, भाजपमध्ये कमालीची शांतता

वरिष्ठ नेते वादापासून दूर; बोलण्यासही नकार


11th June, 12:15 am
मंत्र्यांचे वाद मात्र, भाजपमध्ये कमालीची शांतता

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मंत्री गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर जाहीरपणे टीकास्त्र सोडल्यानंतर सुरू झालेला वाद शमत असतानाच, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉतील डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या कारणावरून गेल्या चार दिवसांपासून राज्यात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकारात प्रदेश भाजपात मात्र कमालीची शांतता पसरली आहे.
भाजपात शिस्तीला महत्त्व असते. पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्यात येते, असे भाजपचे वरिष्ठ नेते कायमच सांगत असतात. परंतु, मंत्री गावडे आणि राणे यांनी निर्माण केलेल्या वादानंतर मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह कोअर समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मौनव्रत धारण केले आहे. यातील एकही नेता आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरचा अपमान करून चूक केल्याचे बोलण्यास तयार नाही. किंबहुना या प्रकरणाकडे या सर्वांनीच जाणीवपूर्वक काणाडोळा केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतही मौन
मंत्री गावडे आणि राणे यांनी तयार केलेल्या वादामुळे मंत्रिपदासाठी​ इच्छुक असलेल्या आमदारांच्या मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भातील आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. पण, त्यावरही मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे इच्छुकांत पुन्हा निराशा पसरली आहे.