डॉ. जयप्रकाश तिवारी होणार गोमेकॉचे नवे डीन

डॉ. बांदेकर यांचा कार्यकाळ ३० जूनला संपणार


11th June, 12:18 am
डॉ. जयप्रकाश तिवारी होणार गोमेकॉचे नवे डीन

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे (गोमेकॉ) डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांचा कार्यकाळ येत्या ३० जून रोजी समाप्त होत आहे. त्यांच्याजागी नवे डीन म्हणून प्रसिद्ध किडनीतज्ञ डॉ. जयप्रकाश पी. तिवारी यांची वर्णी लागणार आहे. येत्या १ जुलैपासून तिवारी डीन पदाचा ताबा स्वीकारणार आहेत, अशी माहिती गोमेकॉतील सूत्रांनी मंगळवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
डॉ. शिवानंद बांदेकर यांची २०२१ मध्ये गोमेकॉचे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी या पदासाठी तीन व्यक्ती स्पर्धेत होत्या. त्यातून बांदेकर यांची या पदावर नियुक्ती झालेली होती. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे ते जवळचे असल्यामुळेच त्यांची थेट डीनपदी नियुक्ती झाल्याच्या चर्चाही त्यावेळी सुरू होत्या. गोमेकॉत दर्जेदार उपचार पद्धती आणण्याच्या दृष्टीने त्यांनी या चार वर्षांत प्रयत्न केले. अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया गोमेकॉत सुरू करण्यातही त्यांचे मोठे योगदान असून, त्याचा गोव्यासह इतर रा​ज्यांतील अनेक रुग्णांना फायदा मिळाला आहे.
दरम्यान, वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्याने बांदेकर यांचा कार्यकाळ येत्या ३० जून रोजी समाप्त होणार आहे. त्यांच्याजागी नवे डीन म्हणून डॉ. जयप्रकाश तिवारी यांची नेमणूक निश्चित झाली आहे. तिवारी अनेक वर्षांपासून गोमेकॉत सेवा देत असून, गोवा लोकसेवा आयोगानेही त्यांना मान्यता दिली आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. डीन पदाचा ताबा घेतल्यानंतर डॉ. तिवारी यांचा कार्यकाळ एक वर्षाचाच असेल, असेही​ सूत्रांनी नमूद केले.