हरमल येथे २.५९ कोटींच्या ड्रग्जसह तिघांना अटक

एएनसीची कारवाई : संशयित तिघेही ​स्वीडनचे नागरिक


11th June, 12:25 am
हरमल येथे २.५९ कोटींच्या ड्रग्जसह तिघांना अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) राज्यातून ड्रग्ज व्यवसायाला हद्दपार करायचा चंग बांधला आहे. पथकाकडून या व्यवसायातील लोकांवर बारीक नजर ठेवली जात असून संशय बळावताच छापा टाकून झडती घेतली जात आहे. हरमल येथे पथकाने छापा टाकून तब्बल २.५९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी स्वीडनच्या तीन नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे.
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) मधलावाडा - हरमल येथे छापा टाकून अटक केलेल्या तिघा स्वीडनच्या नागरिकांची नावे अँड्रियास लोरेन्झो कॅालिक (३९), सामी अँटेरो हिल्डन टँस्कानेन (३६) आणि जोएल इमॅान्युएल कार्लस्ट्रॉम (३३) अशी आहेत. एएनसीच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधलावाडा-हरमल परिसरात राहत असलेले विदेशी नागरिक ड्रग्ज तस्करीत गुंतल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सावंत आणि उपअधीक्षक नेर्लन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजित पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर व इतर पथकाने वरील ठिकाणी भाड्याच्या खोलीवर सोमवारी रात्री छापा टाकला. त्यावेळी एएनसीच्या पथकाने अँड्रियास लोरेन्झो कॅालिक (३९), सामी अँटेरो हिल्डन टँस्कानेन (३६) आणि जोएल इमॅन्युएल कार्लस्ट्रॉम (३३) या स्वीडनच्या नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांची आणि खोलीची झडती घेतली. त्यावेळी पथकाने २.५९ कोटी रुपये किमतीचे २४.८ ग्रॅम एलएसडी लिक्विड, ०.६ ग्रॅम एलएसडी ७० पेपर आणि ४९.३ ग्रॅम केटामाईन लिक्विड जप्त केले. एएनसीचे उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर यांनी संशयितांच्या विरोधात अमली पदार्थविरोधी कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
तिघांचेही गोव्यात बेकायदेशीर वास्तव्य
मधलावाडा-हरमल येथे छापा टाकून ड्रग्ज बाळगल्याबद्दल अटक केलेले तिघेही स्वीडनचे नागरिक गोव्यात बेकायदेशीररीत्या रहात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर मांद्रे पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. गुन्हेगारांना वेळीच ओळखता यावे यासाठी घर मालकांना भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलीस स्थानकात देण्याचे आवाहन केले जाते. घरमालकांनी वेळीच भाडेकरूंची माहिती दिल्यास गुन्हेगारांना चाप बसणे शक्य होईल.