तीन हजार आदिवासी विद्यार्थ्यांनींना ‘विद्या लक्ष्मी’ प्रसन्न

आदिवासी कल्याण खात्याची योजना : पाच वर्षांत ९.६२ कोटींचा खर्च

Story: समीप नार्वेकर |
11th June, 12:27 am
तीन हजार आदिवासी विद्यार्थ्यांनींना ‘विद्या लक्ष्मी’ प्रसन्न

गोवन वार्ता
पणजी : आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आदिवासी कल्याण खात्यातर्फे ‘विद्या लक्ष्मी’ योजना राबवण्यात येते. गेल्या पाच वर्षांत पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेसाठी पाच वर्षांत सुमारे ९.६२ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती आदिवासी कल्याण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
या योजनेसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थिनीच पात्र ठरतात. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांहून अधिक नसावे. या योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी मदत म्हणून लाभार्थी विद्यार्थिनीच्या शैक्षणिक बँक खात्यात २५ हजार रुपयांची मुदत ठेव जमा केली जाते. विद्यार्थी विज्ञान, कला, वाणिज्य, आयटीआय किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतो. लाभार्थीने बारावी किंवा समकक्ष परीक्षा तीन प्रयत्नांत किंवा पहिल्या प्रयत्नानंतर दोन वर्षांत उत्तीर्ण केल्यास, ही ठेव त्यांना देण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण होण्यात लाभार्थीला अपयश आल्यास किंवा शिक्षण पूर्ण न केल्यास ही रक्कम शासनाकडे परत जमा केली जाते.
गेल्या पाच वर्षांत ‘विद्या लक्ष्मी’ योजनेचा ३,८५६ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. वरील काळात या योजनेसाठी सरकारने ९.६२ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. मागील चार वर्षांत दरवर्षी ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. यावर्षी मात्र केवळ ६०० विद्यार्थीच योजनेचा लाभ घेत आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन आदिवासी कल्याण संचालनालयाने केले आहे.