नॅशनल सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी
पणजी : योनेक्स-सनराईज ऑल इंडिया सब-ज्युनियर (१५ आणि १७ वर्षांखालील) रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा २०२५ मध्ये गोव्याचे ओविस तहसीलदार आणि देवांश सकपाळ यांनी दुसऱ्या दिवशी अप्रतिम खेळी करत प्रेक्षकांची मने जिंकली.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात ओविसने तामिळनाडूच्या सबरीश्वरन लोगनाथन गायत्री याचा १५-४, १५-९ असा सरळ गेममध्ये पराभव केला. दुसरीकडे, देवांशने गुजरातच्या रुद्र प्रताप सिंगविरुद्ध कडवी झुंज देत पहिला गेम १९-१७ असा जिंकला आणि दुसऱ्या गेममध्ये १५-५ असा सहज विजय मिळवला. या विजयामुळे गोव्याच्या पदक आशा जिवंत राहिल्या आहेत.
मात्र गोव्याच्या काही प्रमुख खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. गोव्यातील अग्रगण्य शटलर शेन डिसोझा याला महाराष्ट्राच्या अनिश्वर्या देशमुख याने १५-१३, १५-९ अशा गेममध्ये पराभूत केले.
हर्ष मुळीक हरियाणाच्या गगन सिंगकडून ९-१५, ११-१५ ने, रामचंद्र पाटील सिक्कीमच्या आनाश धमालाकडून ५-१५, ५-१५ ने, तर शौर्य नाईक महाराष्ट्राच्या सचेत त्रिपाठीकडून ७-१५, ४-१५ ने पराभूत झाला. गौरव पराडकर, अलोसियस रोड्रिग्ज, शेन डिसोझा आणि राज धुमे या सर्व खेळाडूंनाही अधिक रँकिंग असलेल्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव स्वीकारावा लागला.
मुलींच्या १५ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या विधी सैनी हिने गोव्याच्या अवनी ख्यालियाला १५-५, १५-८ अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. १७ वर्षांखालील गटात गोव्याची सुफिया शेखने प्रखर लढा दिला, परंतु मध्य प्रदेशच्या आठव्या मानांकित नित्या जादोनकडून १२-१५, १०-१५ असा पराभव पत्करावा लागला.
राष्ट्रीय स्पर्धेतील मानांकित खेळाडूंची आगेकूच
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात टॉप सिड अवधूत कदम (महाराष्ट्र) याने कर्नाटकच्या हेशान हरीशवर सहज विजय मिळवला. दुसऱ्या मानांकित पार्थ गावरी (हरियाणा) याने शयान फाज (कर्नाटक) याला १५-७, १५-७ ने हरवले. तिसरा मानांकित पार्थ पुरी (गुजरात) याने जसराज सिंग सलूजा (मध्य प्रदेश) याच्यावर १५-१३, १६-१८, १५-११ असा थरारक विजय मिळवला. चौथ्या मानांकित सिवाचरण गणेशन (तामिळनाडू) याने शशिष पोटनाबोईना (आंध्र प्रदेश) याचा १५-९, १५-२ असा सहज पराभव केला.
मुलींच्या गटात शांतिप्रिया, हरीनी पुढील फेरीत
१७ वर्षांखालील गटामध्ये शांतिप्रिया हजारिका (आसाम) हिने महाराष्ट्राच्या मौसमी माने पाटीलवर १५-३, १५-५ असा एकतर्फी विजय मिळवला. दुसरी मानांकित हरीनी राजा (तामिळनाडू) हिने रित्विका श्री भुक्या (तेलंगणा) ला वॉकओव्हर दिला.