नवीन मंत्री, शपथविधीबाबत अद्याप निर्णय नाही
पणजी : कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रीमंडळातून वगळल्यानंतर राज्यभरात चर्चेची लाट पसरली आहे. फोंडा (Ponda) येथे आदिवासी कल्याण खात्यावरील केलेले आरोप गावडे यांना भोवल्याची चर्चा सुरू असून विरोधी पक्षाने मात्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विद्यमान मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले असताना त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सरकारने आदिवासी समाजाचे प्रमुख नेते असलेल्या गोविंद गावडे (Govind Gaude) यांना मंत्रीमंडळातून हटवल्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मांडले होते.
याच प्रकरणाविषयी एक महत्त्वाची बाब समोर येतेय. गोविंद गावडे यांना मंत्रीमंडळातून वगळण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांनी दिली आहे. नवीन मंत्र्याची नियुक्ती वा शपथविधीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर राज्यपालांनी गोविंद गावडे यांना मंत्रीमंडळातून काढण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर टीका केल्यानंतर गोविंद गावडे यांचे मंत्रिपद जाणे अपेक्षित होते. त्यांचे मंत्रिपद कधी जाणार, याची चर्चा बरेच दिवस सुरू होती. अखेरीस बुधवारी सायंकाळी हा निर्णय झाला व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
नवीन मंत्री कोण असेल? व त्याचा शपथविधी केव्हा होईल? याबाबत जनतेमध्ये कमालीचे औत्सुक्य आहे. नवीन मंत्र्याचा मंत्रिमंडळात समावेश करणे वा एखाद्याला मंत्रीमंडळातून काढून टाकणे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. यामुळे आज याबाबत पत्रकारांनी विचारले असता नवीन मंत्री व शपथविधी बाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.