भारतीय यंग ब्रिगेडची आजपासून ‘कसोटी’

तेंडुलकर-अँडरसन चषक : इंग्लंडविरुद्ध मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
20th June, 12:27 am
भारतीय यंग ब्रिगेडची आजपासून ‘कसोटी’

लीड्स : भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी मालिका शुक्रवारी, २० जूनपासून सुरु होणार आहे. यावेळी पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर होणार आहे. जिथे मालिकेतील तिसरा सामना खेळवला जातो. विशेष म्हणजे, यावेळी येथे फेब्रुवारीपासून पाऊस नसल्यामुळे खेळपट्टी पूर्णत: कोरडी असून वातावरण देखील उष्ण आहे. जे इंग्लंडसारख्या देशात दुर्मीळ असून भारतीयांसाठी जमेची बाजू ठरू शकते.

तीन दिवसांपूर्वी हिरवी दिसणारी खेळपट्टी आता कोरडी आणि थोडी सपाट झाली आहे. खेळपट्टीचे क्युरेटर रिचर्ड रॉबिन्सन यांच्या मते, फलंदाजांनाही चांगले खेळता येईल, अशी संतुलित खेळपट्टी तयार केली आहे. पहिल्या दिवशी काही प्रमाणात स्विंग आणि सीम मिळणे अपेक्षित आहे, पण त्यानंतर खेळपट्टी सपाट होण्याची शक्यता आहे. खेळपट्टी उष्णतेमुळे खराब होणार नाही, हे लक्षात घेता नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणे फायदेशीर ठरू शकते. इंग्लंडने मागील २२ पैकी १६ वेळा प्रथम गोलंदाजी करून यशही मिळवले आहे.
या दौऱ्याच्या माध्यमातून शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एक नवीन पर्वात प्रवेश करत आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडू यावेळी संघात नाहीत. त्याऐवजी यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, करुण नायर, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे युवा खेळाडू संघाचा भाग आहेत. यातील अनेकांनी इंग्लंडमध्ये टेस्ट क्रिकेट खेळलेले नाही.
इंग्लंडमध्ये ‘ड्यूक बॉल’ वापरला जातो, जो उंच शिवणीसह बराच वेळ स्विंग होतो. ढगाळ हवामान, हिरवेगार आउटफील्ड आणि दमट वातावरण यामुळे इंग्लंडची खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक असते. भारताच्या फलंदाजांनी येथे आजवर चांगली कामगिरी करण्यासाठी संघर्ष केला आहे. येथे भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजीची सरासरी फक्त ३०.३१ आहे. ही भारताची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वाईट सरासरी आहे. (दक्षिण आफ्रिकेत सर्वात वाईट २८.८८ आहे).

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंग्लंड विरुद्ध इंडिया पहिल्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होईल. तर ३ वाजता नाणेफेक होईल. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओहॉटस्टार अॅपवर लाईव्ह पाहायला मिळेल.
करूण नायरला संधी मिळणार?भारताचा उपकर्णधार ऋषभ पंतने पत्रकार परिषदेत, भारतीय संघाच्या फलंदाजीक्रमाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. या दौऱ्यावर शुबमन गिल चौथ्या क्रमांकावर खेळणार असल्याची माहिती ऋषभ पंतने दिली. तर पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार, हे अजूनही स्पष्ट झाले नसल्याचे पंतने सांगितले. दरम्यान पहिल्या कसोटीसाठी करूण नायरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो. जर गिल चौथ्या आणि ऋषभ पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार असेल, तर करूण नायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. कारण यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरूवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.
इंग्लंडमध्ये भारताची खराब कामगिरी
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघात कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत १३६ सामने खेळवण्यात आले आहेत. भारताला फक्त ३५ सामन्यांमध्ये विजयी होता आले आहे. तर ५१ सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले​ आहे. तर ५० सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताची इंग्लंडमधील आकडेवारी ही चिंताजनक आहे. टीम इंडियाने इंग्लंडमध्ये एकूण ६७ सामने खेळले आहेत. टीम इंडियाला त्यापैकी फक्त ९ सामनेच जिंकता आले आहेत. तर तब्बल ३६ सामन्यांमध्ये पराभूत व्हावे लागले. तर टीम इंडिया २२ सामने बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरली आहे.
टीम इंडियाची हेडिंग्लेमधील कामगिरी
दरम्यान टीम इंडियाने हेडिंग्लेमधील या मैदानात १९५२ साली पहिला सामना खेळला होता. टीम इंडियाला तेव्हा ७ विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. तेव्हापासून टीम इंडियाने हेडिंग्ले येथे ७ सामने खेळले आहेत. भारताला ७ पैकी फक्त २ सामन्यांमध्येच विजयी होता आले आहे. उभयसंघातील १ सामना हा अनिर्णित राहिला. तर इंग्लंडने ४ सामन्यांमध्ये टीम इंडियावर विजय मिळवला आहे. २०२१ मध्ये, भारताला हेडिंग्लेवर डावाने आणि ३६ धावांनी पराभव सहन करावा लागला होता. तर २००२ मध्ये, भारताने इंग्लंडला डावाने आणि ४६ धावांनी नमवले होते.
भारताचा संघ : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उप-कर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इस्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रविंद्र जाडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा
इंग्लंडचा संघ :हॅरी ब्रुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, जेमी स्मिथ, बेन स्टोक्स, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, ख्रिस वोक्स, सॅम कुक, शोएब बशीर, जोश टंग
आजचा सामना
भारत विरुद्ध इंग्लंड
वेळ : दुपारी ३.३० वा.
स्थळ : हेडिंग्ले मैदान, लीड्स
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क, जीओ हॉटस्टार

संघ विराट, रोहितशिवाय खेळणार
भारतीय संघ बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय मैदानात उतरणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. गिलवर मोठी जबाबदारी असणार आहे. कारण संघाचे नेतृत्व करत असताना त्याला फलंदाजीतही योगदान द्यावे लागणार आहे. तसेच केएल राहुल डावाची सुरूवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. राहुल या संघातील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या सुरूवातीची अपेक्षा असणार आहे. दुसरीकडे इंग्लंडचा संघ मायदेशात आपला विजयीरथ पुढे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे.