पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यासाठी उद्या समितीची बैठक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th July, 04:13 pm
पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यासाठी उद्या समितीची बैठक

पणजी : पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे स्वरूप ठरवण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक उद्या, ७ जुलै रोजी सकाळी विधानभवनात होणार आहे. सभापती रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल, अशी माहिती विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांनी दिली.

या बैठकीत अधिवेशनातील प्रश्नांची संख्या, झीरो अवर (शून्य तास) आणि लक्षवेधी सूचनांच्या चर्चेचा कालावधी ठरविण्यात येईल. यंदाचे अधिवेशन २१ जुलैपासून ८ ऑगस्टपर्यंत चालणार असून एकूण १५ दिवसांचे अधिवेशन होणार आहे. यासाठी आमदारांकडून प्रश्न स्वीकारण्यास सुरुवात झाली असून १५ जुलैपर्यंत प्रश्न स्वीकारले जातील. शुक्रवारचा दिवस खाजगी कामकाजासाठी राखीव असेल. अधिवेशनादरम्यान सकाळी ११.३० वाजता सभा सुरू होणार असून सुरुवातीला प्रश्नोत्तरांचे सत्र, त्यानंतर झीरो अवर व लक्षवेधी सूचनांवर चर्चा होईल. दुपारनंतर विधेयकांवरील चर्चा व खात्यांच्या मागण्यांना मंजुरी दिली जाईल.

 दरम्यान, अद्याप सरकारकडून सादर होणारी विधेयके निश्चित करण्यात आलेली नाहीत. गेल्यावर्षी पावसाळी अधिवेशन १८ दिवसांचे होते, त्यामुळे यंदाच्या १५ दिवसांच्या कालावधीवर काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व आरजी या विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस विधीमंडळ गटाची रणनिती ठरवण्यासाठी बैठकही यापूर्वीच पार पडली आहे.


हेही वाचा