बुरखाधारी चोरांचा महिलेवर हल्ला : अडीच लाखांचा ऐवज लांबवला
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : आषाढी एकादशीचा उत्सव साजरा होत असतानाच होंडा सालेली येथे बुरखाधारी दोघा चोरांनी एका महिलेवर धारदार चाकूने हल्ला करून मंगळसूत्रासह अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या हल्ल्यात वैशाली पेडणेकर जखमी झाल्या. अज्ञात चोरांविरोधात वाळपई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आठ दिवसांपूर्वीच पेडणेकर कुटुंबीय गृहप्रवेश करून राहायला आले होते. या चोरीच्या घटनेची तक्रार होंडा पोलीस चौकीवर नोंद झाली असून वाळपई पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
सालेली येथे आठ दिवसांपूर्वी गृहप्रवेश करून राहायला आलेल्या साईनाथ पेडणेकर यांच्या घरात घुसून दोघा चोरांनी त्यांच्या पत्नी वैशाली पेडणेकर यांच्यावर चाकूचा वार करून मंगळसूत्र, तसेच सोन्याचे दागिने घेऊन धूम ठोकली. याविषयी वैशाली पेडणेकर यांनी सांगितले की, रविवारी सकाळी ८.३०च्या दरम्यान तोंडावर मास्क घालून समोरच्या दाराने दोन अज्ञात व्यक्ती आल्या. वैशाली यांनी दोन लहान मुलांना खोलीत बंद करून घराचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला; परंतु चोरांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेऊन दरवाजा उघडला व घरात प्रवेश केला. या झटापटीत चाकूचा वार वैशाली यांच्या हातावर बसला. कपाटात ठेवलेल्या मंगळसूत्रासह अन्य किमती वस्तू घेऊन मागच्या दाराने त्यांनी पळ काढला. त्या व्यक्ती कोकणी भाषेत बोलत होत्या, असे वैशाली यांनी सांगितले.
या घटनेमुळे सालेली परिसरात खळबळ माजली असून, भरदिवसा चोरीची प्रकार घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या चोरीचा कसून तपास करून चोरांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ठसेतज्ज्ञ, श्वानपथकाची मदत
चोरीच्या घटनेची माहिती रात्रपाळीवर गेलेले त्यांचे पती साईनाथ पेडणेकर यांना मिळताच त्यांनी तातडीने होंडा पोलीस चौकीवर धाव घेतली. वापळई पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची यंत्रणा सुरू केली. ठसेतज्ज्ञ व श्वानपथक आणून तपास केला. श्वानपथक घराच्या पाठीमागे जाऊन घुटमळले. पाऊस खूप असल्याने चोरांचा माग घेता आला नाही, असे पेडणेकर यांनी सांगितले.