नीट, जेईई परीक्षांचे शिक्षकांना ज्ञान नसणे ही चिंतेची बाब: मुख्यमंत्री

‘गोवा करिअर नेव्हिगेटर २०२५’चे उद्घाटन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 hours ago
नीट, जेईई परीक्षांचे शिक्षकांना ज्ञान नसणे ही चिंतेची बाब: मुख्यमंत्री

पणजी : राज्यातील काही उच्च माध्यमिक विद्यालयांतील शिक्षकांना नीट व जेईई परीक्षांविषयी पुरेशी माहितीच नसल्याने ही चिंतेची बाब आहे. शिक्षकांना जरच या परीक्षांविषयी माहिती नसेल, तर ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार, असा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘गोवा करिअर नेव्हिगेटर २०२५’ या करिअर मार्गदर्शन उपक्रमाचे उद्घाटन कला अकादमीमध्ये झाले. हे कार्यक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि युनोक्यू एज्युटेक या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास एससीईआरटीच्या संचालक मेघना सेतगावकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, तांत्रिक शिक्षण संचालक डॉ. विवेक कामत, युनोक्यू एज्युटेकचे संस्थापक धवल गांधी, राहील शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गोव्यातील अनेक विद्यार्थी नीट आणि जेईई सारख्या प्रवेश परीक्षा उत्तम रीत्या उत्तीर्ण होत आहेत. मात्र अजूनही अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षांविषयी माहितीच नसते. ही जबाबदारी केवळ पालकांची नाही, तर शिक्षकांचीसुद्धा आहे.
ते पुढे म्हणाले, बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला मी जेईई परीक्षा का दिली नाहीस, असे विचारले असता त्याने सांगितले की, ही परीक्षा काय असते आणि इंजिनिअरिंगला प्रवेशासाठी ती गरजेची असते, हेच त्याला माहिती नव्हते. ही माहिती देणे हे शिक्षकांचे काम आहे. पण दुर्दैवाने अनेक शिक्षकांनाच याबाबत काहीच कल्पना नाही, हे ऐकून मला वाईट वाटले.
याेग्य मार्ग निवडा
पुढील ७० ते ८० वर्षे आयुष्यात काय करायचे आहे, हे ठरवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासून तयारी करायला हवी. सरकार आपल्या करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. करिअर मार्गदर्शन हा केवळ अभ्यासक्रमाचा भाग नसून, तुमच्या कौशल्यांनुसार व आवडीनुसार योग्य दिशा निवडण्याचा मार्ग आहे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिला.