१५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचे घबाड

२४ घरे, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन, ३५० ग्रॅम सोने, १.५ किलो चांदी, चार गाड्या यांचा समावेश

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
01st August 2025, 08:57 pm
१५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचे घबाड

कोप्पल : कर्नाटकातील कोप्पल येथे राहणाऱ्या एका माजी क्लार्कच्या घरी लोकायुक्ताने टाकलेल्या छाप्यात तब्बल ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता सापडली आहे. कलाकप्पा निदागुंडी असे या माजी क्लार्कचे नाव आहे.
आरोपी कलाकप्पाच्या घरातून लोकायुक्तने जप्त केलेल्या मालमत्तेत २४ घरे, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन, ३५० ग्रॅम सोने, १.५ किलो चांदी आणि चार गाड्या यांचा समावेश आहे.
सर्व मालमत्ता कलाकप्पा निदागुंडीच्या नावावर, त्याच्या पत्नीच्या नावावर आणि त्याच्या भावाच्या नावावर होती. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ज्या माजी क्लार्कच्या घरातून ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता सापडली त्याचा पगार फक्त १५ हजार रुपये होता.
तक्रारीनंतर ही छापेमारी करण्यात आली, कोप्पलचे आमदार के. राघवेंद्र हितनल यांनी सखोल चौकशीनंतर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. कलाकप्पा आणि माजी केआरआयडीएल इंजिनिअर झेड.एम. चिंचोलकर यांनी ९६ अपूर्ण प्रकल्पांसाठी बनावट कागदपत्रे तयार करून ७२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम लुटल्याचा आरोप आहे.