खाजगी विद्यापीठामुळे शिक्षण क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने विद्यार्थ्यांनाच फायदा होईल

स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल : मुख्यमंत्री

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
खाजगी विद्यापीठामुळे शिक्षण क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने विद्यार्थ्यांनाच फायदा होईल

पणजी : गोव्यात खाजगी विद्यापीठामुळे शिक्षण संस्थांमध्ये स्पर्धा वाढेल. याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होणार आहे. खाजगी विद्यापीठामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार नाही. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गुरुवारी पणजी येथे पारुल खाजगी विद्यापीठाच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉ. देवांशू पटेल, पारुल पटेल, गितिका पटेल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्या कार्यकाळात खाजगी विद्यापीठ विधेयक मंजूर झाले. याबाबत मी पहिल्यापासूनच आग्रही होतो. खाजगी विद्यापीठाला विरोध करणाऱ्यांनी केपे येथे जाऊन पारुल विद्यापीठ नक्की पहावे. चालू शैक्षणिक वर्षात येथे ५५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यातील ७५ टक्के विद्यार्थी गोमंतकीय आहेत. तसेच ७० टक्के कर्मचारी स्थानिक आहेत. पुढील काही वर्षात येथे १५०० स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पारुलने स्थानिक विद्यार्थ्यांना सुमारे १.१ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे.

ते म्हणाले, स्थानिक विद्यार्थ्यांना आवडत्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नाही तर त्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जावे लागते. काही विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेणे परवडत नाही. अशा वेळी विद्यार्थी शिक्षण घेणे थांबवतात. अशा विद्यार्थ्यांसाठी पारुलसारखे खाजगी विद्यापीठ नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. गोव्यात राहून उच्च शिक्षण होत असेल तर पालक निश्चिंत राहतील. पारुल येथे व्यवसाय करण्यासाठी आलेले नाही हे लक्षात घ्यावे. पारूलला नॅक अ ++ दर्जा आहे. या विद्यापीठामुळे राज्यात चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध होणार आहे.

तरच नवीन खाजगी विद्यापीठाला परवानगी

मुख्यमंत्री म्हणाले की, पारुल सोडून राज्य सरकारने गोव्यात अन्य दोन खाजगी विद्यापीठांना परवानगी दिली आहे. सध्या आणखी विद्यापीठांना परवानगी देणार नाही. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम असणारे विदेशी विद्यापीठ असेल तरच आम्ही विचार करणार आहोत.

गोमंतकीय विद्यार्थ्यांना २० टक्के सवलत

डॉ.देवांशू पटेल यांनी सांगितले की, पारुल विद्यापीठाने गोमंतकीय विद्यार्थ्यांना ट्युशन फी मध्ये २० टक्के सवलत दिली आहे. सध्या येथे १४ प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. पुढील काही वर्षात वैद्यकशास्त्र, आयुर्वेद, हॉटेल मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रम सुरू करण्याचा आमचा विचार आहे.

हेही वाचा