बारमेर, राजस्थान येथील ह्रदय हेलावून टाकणारी घटना
जयपूर: ६०० किलोमीटरचा लांबचा प्रवास करून प्रेयसीने प्रियकराला लग्नाची मागणी घातली. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याच प्रियकराने तिचा अत्यंत क्रूरपणे खून केला. हृदय हेलावून टाकणारी ही घटना राजस्थानमधील बारमेर येथे घडली असून, पोलिसांनी शालेय शिक्षक असलेल्या प्रियकर मनाराम याला अटक केली आहे.
झुनझुनु येथील अंगणवाडी सुपरवायझर असलेल्या ३७ वर्षीय मुकेश कुमारीने दहा वर्षांपूर्वी आपल्या पतीपासून फारकत घेतली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात फेसबुकवरून तिचे बारमेर येथील शिक्षक मनारामशी सूत जुळले. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि संबंध प्रस्थापित झाले. मुकेश, आपले घर सोडून ६०० किमी दूर असलेल्या प्रियकराला भेटायला येत होती. ती त्याच्यासोबत नवीन संसार सुरू करू इच्छित होती. मुकेशने पतीला घटस्फोट दिला होता, तर मनारामने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश मनारामवर लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत होती. त्यामुळे त्यांच्यात खटके उडत होते.
१० सप्टेंबरच्या रात्री मुकेश आपली ‘अल्टो’ कार चालवत मनारामच्या घरी पोहोचली. तिने थेट त्याच्या कुटुंबीयांनाही त्यांच्या संबंधांची माहिती दिली. त्यामुळे मनाराम प्रचंड संतापला. वाद इतका वाढला की स्थानिक पोलिसांनाही बोलावण्यात आले. पोलिसांनी दोघांना समजावून आपापसात प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मनारामने मुकेशला शांतपणे बोलूया असे सांगितले. मात्र, त्याच रात्री त्याने लोखंडी सळीने तिच्या डोक्यात प्रहार करून तिचा खून केला. त्यानंतर त्याने मुकेशचा मृतदेह तिच्याच कारच्या चालकाच्या सीटवर ठेवला आणि तो अपघात असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मनाराम आपल्या खोलीत येऊन शांतपणे झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याने आपल्या वकिलाला घडलेल्या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता त्यांना काहीतरी वेगळे असल्याचा संशय आला. पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती करताच मनारामने अखेर सर्व माहिती पोलिसांना दिली आणि आपला गुन्हा कबूल केला. मुकेशचा मृतदेह सध्या जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला असून, तिचे कुटुंबीय बारमेरला पोहोचण्याची पोलीस वाट पाहत आहेत.