ट्रॅव्हल्स एजंट कृष्णा नाईक याला २५ हजारांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन मंजूर
मडगाव : दूधसागर धबधब्याला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना माघारी येताना मालगाडीतून प्रवास करण्याचा सल्ला देणाऱ्या ट्रॅव्हल्स एजंट कृष्णा नाईक (कुळे) याला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात दक्षिण पश्चिम रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणातील पर्यटक कुणाल कपूर आणि शेखर तिवारी १६ जुलै २०२५ रोजी गोव्यात पर्यटनासाठी आले होते. त्यांनी स्वतःच्या वाहनाने कुळे येथे जाऊन दूधसागर धबधब्याला भेट देण्याची योजना आखली. तिथे त्यांची ओळख ट्रॅव्हल्स एजंट कृष्णा नाईकशी झाली. नाईकने त्यांची इतर पर्यटकांसह रेल्वेने दूधसागरला जाण्याची व्यवस्था केली. मात्र, परत येताना नाईकने त्यांना दूधसागर येथे आलेल्या मालगाडीत अनधिकृतपणे चढण्याचा सल्ला दिला. यानंतर नाईकविरोधात त्यांनी दक्षिण पश्चिम रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
यानंतर कृष्णा नाईक यांनी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सरकारी वकिलांनी जामिनाला विरोध करताना, अर्जदार राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्ती असून तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, असा युक्तिवाद केला. तर, संशयिताच्या वकिलांनी ज्या गुन्ह्यासाठी चौकशी सुरू आहे, त्यासाठी अटकेची आवश्यकता नसल्याचा मुद्दा मांडला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश शेरीन पॉल यांनी संशयिताला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. २५ हजारांचा वैयक्तिक बाँड, तपास अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार हमीदार देणे, न्यायालयाच्या परवानगीविना राज्याबाहेर न जाणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे अशा अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.