डिलरांकडून ऑफर ११ दिवसांत राज्यात ५,५३७ वाहनांची खरेदी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरात केलेली कपात, तसेच सणासुदीच्या काळात वाहन डीलरतर्फे देण्यात आलेल्या ऑफर आदी कारणांमुळे राज्यात वाहन खरेदीत वाढ झाली आहे. जीएसटी कपात २२ सप्टेंबरपासून लागू झाली. २ ऑक्टोबर रोजी दसरा (विजयादशमी) होता. या अकरा दिवसांत राज्यात एकूण ५,५३७ वाहनांची खरेदी झाली आहे. याचाच अर्थ दिवसाला तब्बल ५५३ वाहने विकली गेली आहेत. एकूण वाहन विक्रीपैकी ५,०५४ ही खासगी वापरासाठी घेण्यात आलेली वाहने आहेत. दिवाळी सणामुळे पुढील काही दिवसांत वाहन खरेदी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने नवीन वाहन खरेदीवरील जीएसटी दर कमी केले होते. २२ सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. पूर्वी दुचाकींना २८ टक्के जीएसटी लागू होता. २२ सप्टेंबरनंतर तो कमी करून १८ टक्क्यांवर आणला गेला. आधी लक्झरी वगळता अन्य कारना २८ ते ३१ टक्के जीएसटी अधिक १ ते ३ टक्के सेस द्यावा लागत होता. २२ सप्टेंबरनंतर जीएसटी १८ टक्के केला गेला, तर सेस माफ करण्यात आला. यामुळे वाहनांचे दर कमी झाले. वाहन कंपन्यांनी जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांना उपलब्ध करून दिला.
केंद्र सरकारने जीएसटीमध्ये बदल होणार असे जाहीर केल्यानंतर राज्यातील विविध डिलरनी कारच्या दरात श्रेणीनुसार ४० हजार ते १.५० लाख रुपये, तर दुचाकी दरात ५ ते २० हजार रुपयांपर्यंत सूट दिली. नवरात्री, दसऱ्यानिमित्त देण्यात आलेल्या ऑफरमुळे वाहनांची किंमत आणखी कमी झाली. यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली. मिळालेल्या माहितीनुसार, वरील अकरा दिवसांत एकूण वाहन विक्रीमध्ये ३,६९५ खासगी दुचाकी (६६ टक्के), तर १,४१९ खासगी चारचाकी (२६ टक्के) होत्या.
दसऱ्याच्या काळात १,३४७ वाहनांची खरेदी
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात १ आणि २ ऑक्टोबर या दोन दिवसांतच १,३४७ वाहनांची खरेदी झाली आहे. यामध्ये ३४९ चारचाकी, तर ८८३ दुचाकी आहेत. यादरम्यान ४० हलक्या प्रवासी, तर ३६ हलक्या मालवाहू वाहनांची खरेदी झाली आहे. वरील दोन दिवसांत वाहन नोंदणी तसेच अन्य करांच्या स्वरूपात वाहतूक खात्याला ५ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.
एकूण नोंदणीपैकी ९ टक्के नोंदणी ११ दिवसांतच
राज्यात १ जानेवारी ते २ ऑक्टोबर दरम्यान एकूण ६० हजार ६३८ वाहनांची नोंदणी झाली. यातील ९.१३ टक्के वाहनांची (५,५३७) नोंदणी ही केवळ २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या अकरा दिवसांतच झाली आहे.
