पाठलाग करून हल्लेखोरांनी केली मारहाण !

‘गावडा’, ‘राखणदार’ म्हटले : अखेर १४ दिवसांनंतर रामा काणकोणकर यांचा जबाब नोंद


03rd October 2025, 11:44 pm
पाठलाग करून हल्लेखोरांनी केली मारहाण !

हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना रामा काणकोणकर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पोलिसांनी गुरुवारी रात्री रामा काणकोणकर यांचा जबाब नोंद केला. मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करत असल्याचे, तसेच मारहाण करताना हल्लेखोरांनी आपल्याला ‘गावडा’ आणि ‘राखणदार’ म्हटल्याचे रामा यांनी आपल्या जबाबात सांगितले. रामा काणकोणकर यांच्यावर १८ सप्टेंबर रोजी करंझाळे येथे हल्ला झाला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, रामा यांची शुक्रवारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी भेट घेतली.
सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर करंझाळे येथे झालेल्या हल्लाप्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याच्या संशयावरून कुख्यात गुन्हेगार जेनिटो कार्दोझ (३६, सेंट आगुस्तिन वाडो, सांताक्रूझ) याला पणजी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत जेनिटोसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. जुने गोवा आणि आगशी पोलिसांनी एकूण २३ जणांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, हल्ल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी रामा काणकोणकर यांनी पोलिसांना जबाब दिला. पोलिसानी गुरुवारी रात्री त्याचा जबाब नोंदवून घेतला. यामुळे तपासाला आता दिशा मिळणार आहे. रामा यांनी आपल्या जबाबात म्हटले की, मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करत होता. त्यानंतर काही जणांनी आपणास मारहाण केली. मारहाण करताना हल्लेखोरांनी आपल्याला ‘गावडा’ आणि ‘राखणदार’ म्हटले. रामाने यांनी जबाबत काही जणांची नावे घेतली असून त्यामुळे पोलिसांना तपास करणे सोपे जाणार आहे. दरम्यान, रामा यांनी यापूर्वी पोलिसांना जबाब देण्यास नकार दिला होता; मात्र गुरुवारी त्यांनी जबाब दिला.
उपचारासाठी डॉक्टरांची टीम स्थापन : आरोग्यमंत्री
रामा यांची प्रकृती गंभीर असतानाच शुक्रवारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी अचानक गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाला भेट दिली. रामा यांच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरू आहेत. उपचारासाठी डॉक्टरांची टीम स्थापन केली आहे. रामा यांना डिस्चार्ज देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. उपचारात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही, असे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिले.