जुळ्या बालिकांवर लैंगिक अत्याचार; २० वर्षांची कैद

बाल न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम


03rd October 2025, 11:46 pm
जुळ्या बालिकांवर लैंगिक अत्याचार; २० वर्षांची कैद

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : पेडणे तालुक्यातील ४ वर्षे ९ महिन्यांच्या जुळ्या बहिणींवर २०१९ मध्ये लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बाल न्यायालयाने पेडण्यातील आरोपी टॅक्सी चालकाला २० वर्षे सश्रम कारावास आणि ९ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.
या प्रकरणी ६ मे २०१९ रोजी पेडणे पोलीस स्थानकाचे तत्कालीन उपनिरीक्षक आल्विटो रॉड्रिग्ज यांनी गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलींच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती. आरोपी टॅक्सी चालकाने दोघा जुळ्या बहिणींवर एप्रिल २०१९ मध्ये लैंगिक अत्याचार केले होते. पीडित मुलींची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आले होते. त्यावेळी हा प्रकार समोर आला होता.
पोलिसांनी आरोपीविरोधात भा. दं. सं. कलम ३७६, गोवा बाल कायद्याचे कलम ८ आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या ४, ८ व १२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. पोलिसांनी १८ जून २०१९ रोजी बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी वैद्यकीय अहवाल सकारात्मक, तसेच पीडित मुलींनी न्यायालयात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार बाल न्यायालयाने आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास आणि ९ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. दंडाची रक्कम पीडित मुलींच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत कायम ठेव म्हणून ठेवावी, तसेच दंड न भरल्यास आरोपीला आणखी पाच वर्षे सश्रम कारावास भोगण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.
या शिक्षेला आरोपीच्या पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. १ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती भारती डांगरे व न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने बाल न्यायालयाचा निवाडा कायम ठेवण्याचा आदेश दिला.