साट्रे-सत्तरीतील ९४ वन हक्क दाव्यांना मान्यता

प्रलंबित दावे डिसेंबरपर्यंत निकाली काढण्याचे उद्दिष्ट

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th October, 04:17 pm
साट्रे-सत्तरीतील ९४ वन हक्क दाव्यांना मान्यता

पणजी: उत्तर गोव्यातील प्रलंबित वन हक्क दावे (Forest Rights Claims) तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक आठवड्यात बैठका घेतल्या जात आहेत. याच बैठकांमध्ये साट्रे-सत्तरी ( Sattari) भागातील ९४ वन हक्क दाव्यांना मान्यता देण्यात आली आहे.

उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी ही माहिती दिली आहे. जिल्हा समितीच्या बैठकीत एकूण १०१ अर्जांवर चर्चा झाली. यापैकी, त्रुटी किंवा अपूर्ण सोपस्कार असलेल्या ७ अर्जांना पुढील कार्यवाहीसाठी पुन्हा उपविभागीय समितीकडे (Sub-Divisional Committee) पाठविण्यात आले आहे.

प्रलंबित असलेले सर्व वन हक्क दावे डिसेंबरपर्यंत निकाली काढण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या दिशेने वेगाने काम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले आहे.