लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार; राज्य नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा

पणजीतील महिला पोलिसांची कारवाई


11 hours ago
लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार; राज्य नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नोंद झाली आहे. या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
तिसवाडी तालुक्यातील २४ वर्षीय युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, २७ वर्षीय नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकारी आणि पीडितेची १२ मार्च २०२३ रोजी दक्षिण गोव्यात एका खासगी कार्यक्रमात ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. एप्रिल २०२३ मध्ये त्या अधिकाऱ्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला युवतीने होकार दिला. दोघांच्या कुटुंबियांनीही त्यांच्या निर्णयाला हरकत घेतली नाही. लग्नाची बोलणी सुरू केली. अधिकाऱ्याने ४ मे २०२३ रोजी दक्षिण गोव्यातील त्याच्या फ्लॅटवर, तसेच ७ जून २०२५ रोजी अधिकाऱ्याच्या घरी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. तक्रारीत संबंधित अधिकाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करून फसवणूक केल्याचे म्हटले आहे. याची दखल घेऊन पणजी महिला पोलिसांनी नागरी सेवेतील कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ११५(२) आणि ३५२ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दोन्ही कुटुंबियांतील वाद शिगेला
यानंतर त्या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले. त्यांच्या कुटुंबियांमध्येही वाद सुरू झाले. अधिकाऱ्याने तिला मारहाणही केली.अधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला हरकत घेतली. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी कुटुंबियांमध्ये बोलणी होणार होती, ती रद्द झाली. दरम्यान, अधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी पीडितेच्या घरी येऊन त्यांना मारहाण केली. त्यानंतर पीडितेने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.