‘कांतारा चॅप्टर १’ ते ‘बागी ४’ अॅक्शनने भरपूर आठवडा


16 hours ago
‘कांतारा चॅप्टर १’ ते ‘बागी ४’ अॅक्शनने भरपूर आठवडा


चित्रपट आणि वेब सीरिजप्रेमींसाठी ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा खूप खास ठरणार आहे. कारण या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक अॅक्शन, थ्रिलर, रोमान्स आणि रहस्यांनी भरलेले चित्रपट व वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत.

 

कांतारा चॅप्टर १ । अॅमेझॉन प्राईम
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘कांतारा’ चित्रपटाचा हा प्रीक्वेल आहे. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीचा हा नवीन प्रकल्प पांजुर्ली दैव आणि जंगलातील आत्म्यांच्या पौराणिक उगमावर आधारित आहे. या चित्रपटात बर्मे, कांतारा जमातीचा नेता, आणि शेजारच्या बंग्रा राज्याच्या राजकुमार कुलशेखर यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. अॅक्शन, पुराणकथा आणि आध्यात्मिकतेचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करेल.

 

इडली कढाई । नेटफ्लिक्स
दक्षिणात्य सुपरस्टार धनुष लिखित आणि दिग्दर्शित ‘इडली कढाई’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गाजावाजा केला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.
धनुषसह अरुण विजय, सत्यराज, पी. समुथिरकानी, निथ्या मेनन आणि शालिनी पांडे यांच्या भूमिका विशेष लक्षवेधी आहेत. कथानक एका अशा व्यक्तीभोवती फिरते, ज्याचे वडील पारंपरिक इडलीचे दुकान चालवत असतात आणि त्या व्यवसायाभोवती घडणाऱ्या संघर्षावर हा चित्रपट आधारित आहे.


 
द विचर सीझन ४ । नेटफ्लिक्स
हॉलीवूडमधील सुप्रसिद्ध फॅन्टसी ड्रामा ‘द विचर’चा चौथा सीझन येतोय. लेखक आंद्रेज सपकोव्स्की यांच्या कादंबरीवर आधारित ही सीरिज प्रचंड लोकप्रिय आहे. या सीझनमध्ये हेनरी कैविल, आन्या चालोत्रा आणि फ्रेया अ‍ॅलन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. जादू, युद्ध आणि रहस्यांनी भरलेली ही मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा वेड लावणार आहे.

 

‘लोका चॅप्टर १ : चंद्रा’ । जीओ हॉटस्टार
मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक रहस्यमय थ्रिलर म्हणजे ‘लोका चॅप्टर १ : चंद्रा’. दिग्दर्शन डोमिनिक अरुण यांनी केले असून कल्याणी प्रियदर्शनने मुख्य भूमिका साकारली आहे.
‘चंद्रा’ नावाच्या एका गूढ महिलेची कहाणी आणि तिच्याभोवती फिरणारे रहस्य यावर हा चित्रपट आधारित आहे. मल्याळी सिनेमा चाहत्यांसाठी ही एक अप्रतिम मेजवानी ठरणार आहे.


 

बागी ४ । अॅमेझॉन प्राईम
टायगर श्रॉफ, संजय दत्त, सोनम बाजवा आणि हरनाज संधू यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बागी ४’ हा बॉलीवूडमधील सर्वाधिक प्रतीक्षित अॅक्शन चित्रपटांपैकी एक आहे. दिग्दर्शन ए. हर्ष यांनी केले आहे. ‘बागी’ मालिकेच्या पहिल्या तीन भागांना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. थिएटरमध्ये हा चित्रपट चुकवलेल्या चाहत्यांसाठी आता तो ‘प्राइम व्हिडीओ’वर उपलब्ध होणार आहे.




मारीगल्लू । झी५
देवराज पुजारी लिखित व दिग्दर्शित ‘मारीगल्लू’ ही एक कन्नड थ्रिलर सीरिज आहे.
प्रवीण तेजस आणि निनाद हरित्सा यांच्या दमदार भूमिका या सीरिजमध्ये पाहायला मिळतात. रहस्य आणि थरार यांनी भरलेली ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवते.

 

ट्रेमेंबे । अॅमेझॉन प्राईम
‘ट्रेमेंबे’ ही पाच भागांची ब्राझिलियन मिनीसीरिज वास्तव आणि काल्पनिक घटनांचा अनोखा संगम सादर करते. ही मालिका ब्राझीलमधील ट्रेमेंबे कारागृह संकुलातील सर्वात कुख्यात गुन्हेगारांमधील सत्तासंघर्ष आणि तणावावर प्रकाश टाकते. थरारक आणि वास्तवाशी निगडीत अशा या कथानकामुळे ही सीरिज क्राइम ड्रामा चाहत्यांसाठी एक उत्कृष्ट अनुभव ठरणार आहे.

 

ब्रेथलेस सीझन २ । नेटफ्लिक्स
नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय मेडिकल ड्रामा ‘ब्रेथलेस’चा दुसरा सीझन या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. पहिल्या सीझनच्या शेवटापासून पुढे सुरू होणारा हा भाग व्हॅलेन्सियातील जोआक्विन सोरोला हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या नव्या संघर्षांवर आधारित आहे. आता हे रुग्णालय खासगी व्यवस्थापनाखाली आले असून, त्यामुळे तिथल्या डॉक्टर आणि नर्सेसच्या व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यात नवे ताणतणाव निर्माण होतात. भावनिक आणि वास्तववादी कथानकामुळे हा सीझन अधिक प्रभावी ठरेल.