शाळा, महाविद्यालय, इस्पितळ परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा : सर्वोच्च न्यायालय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
07th November, 01:40 pm
शाळा, महाविद्यालय, इस्पितळ परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली   (New Delhi) : शाळा (School), इस्पितळ (Hospital), महाविद्यालय (College), क्रीडा संकुल, बसस्थानक, रेल्वे स्थानकांच्या परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवावे. भटकी कुत्री तिथे येऊ नयेत यासाठी योग्य फेन्सिंग करण्यात यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत.

भटक्या कुत्र्यांसंदर्भातील (Stray Dogs)  एका प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी करण्याचे ही सर्वोच्च न्यायालयाने नमुद केले आहे. सर्व राज्यांतील रस्ते, राष्ट्रीय महामार्गांवरील (National Highway) भटक्या जनावरांना हटवावे असे ही न्यायालयाने म्हटले आहे. 

इस्पीतळे, शाळा, महाविद्यालये इत्यादीं भोवती कुंपण उभारण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता व एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भात सुनावणी झाली.

सर्व राज्यांतील मुख्य सचिवांनी या निर्देशाची कडक अंमलबजावणी करावी.  तीन सप्ताहात यासंदर्भातील स्थिती अहवाल व प्रत‌िज्ञापत्र दाखल करावे,  असेही आदेशात नमुद केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १३ जानेवारीला होणार आहे. 

तीन महिन्यांपूर्वी राजस्थान उच्च न्यायालयाने जबाबदार सरकारी एजन्सीला जनावरांना रस्त्यावरून दूर करावे, असे निर्देश दिले होते. आडकाठी आणत असलेल्यांवर एफआयआर नोंद करण्याचे त्यात नमुद केले होते.