धाकू मडकईकर, शंकर चोडणकर यांची संधी हुकली

पणजी : आरक्षणानंतर उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर यांच्यासह ८० टक्के विद्यमान सदस्यांचे मतदारसंघ राखीव बनले आहेत. यामुळे निवडणुकीनंतर उत्तर गोवा जिल्हा पंचायतीत ८० टक्के सदस्य हे नवे चेहरे असतील. उत्तर गोव्याचे माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकर यांचा मये मतदारसंघ आता महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचाही पत्ता कट झाला आहे.
उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर यांचा सेंट लॉरेन्स मतदारसंघ हा आता महिला ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच सदस्या देवयानी गावस यांचा केरी मतदारसंघ हा आता अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव ठेवण्यात आला आहे. यामुळे त्या आता केरीतून निवडणूक लढवू शकणार नाहीत.
तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे खंदे समर्थक गोपाळ सुर्लकर यांचा पाळी मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. खोर्ली मतदारसंघ हा सर्वसामान्यांसाठी असल्याने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक यांचा पुन्हा जिल्हा पंचायत सदस्य बनण्याचा मार्ग मोकळा आहे.
दक्षिण गोव्याचा विचार करता दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप यांचा गिर्दोली मतदारसंघ महिला एसटीसाठी आरक्षित असल्याने त्यांना निवडणूक लढविणे शक्य होणार आहे.