शेट्ये ग्रुप मराठा संघ उपविजेता

पणजी : गोव्यातील (Goa) सांगे (Sanguem)येथे साग मैदानावर (SAG) झालेल्या क्षत्रिय मराठा प्रीमियर लीग (केएमपीएल) ०.४ चे (KMPL) विजेतेपद वीर येसाजी कंक (Veer Yesaji Kank) संघाने पटकावले. शेट्ये ग्रुप मराठा संघ उपविजेता ठरला.
दिवसरात्र झालेल्या या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले होते. वीर येसाजी कंक संघाने अंतिम सामन्यात शेट्ये ग्रुप मराठाचा पराभव केला.
शेट्ये ग्रुप मराठा यांना उपविजेते घोषित करण्यात आले. त्यांनी उपात्य सामन्यात रॉयल मराठाचा पराभव केला होता. दुसऱ्या उपात्य सामन्यात मराठा वॉरियर्सने अंतिम चॅम्पियन वीर येसाजी कंकविरुद्ध दमदार कामगिरी पण शेवटी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
एकूण सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कामगिरी केलेले समर्थ गावस यांना मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना राजेश फळ देसाई यांनी प्रायोजित केलेले सुवर्ण नाणे देण्यात आले.
वीर येसाजी कंक संघाचे नागभूषण अंतिम सामन्यातील सामनावीर ठरले. सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार रॉयल मराठा संघाचे हर्षद परब यांनी पटकावला. सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा सन्मान शेट्ये ग्रुप मराठाचे तन्मय शेट्ये यांनी मिळवला.
समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभाला समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, नावेलीचे आमदार तथा कदंबा वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, एजीकेएमएसचे अध्यक्ष सुहास फळदेसाई व इतर मान्यवर उपस्थित होते.
केएमपीएल सीझन ४ चे अध्यक्ष प्रसाद देसाई यांनी स्वागत केले. रूपेश देसाई यांनी स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्व खेळाडू, संघ मालक, प्रायोजक आणि हितचिंतकांचे आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी झाली.