उद्योजकतेचे वातावरण तयार करण्यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना

पणजी : राज्यात विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देऊन नवनिर्मिती व उद्योजकतेचे वातावरण तयार करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री स्वयंरोजगार (Chief Minister self employment) योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेचा शुभारंभ उद्या बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांच्या हस्ते होणार आहे.
सर्वप्रथम महाविद्यालयीन प्राध्यापकांना (College Proffessor) व सरकारी अधिकाऱ्यांना उद्योजकतेचे धडे दिले जातील. ईडीसीमार्फत या योजनेची कार्यवाही केली जाईल. २०३० पर्यंत स्टार्ट अप व उद्योगांसाठी पोषक वातावरण, सुविधा उभारण्याचे उद्दिष्ट आहे.
ईडीसीचे व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र आंगले यानी ही माहिती दिली. आयटीआय, पॉलीटेक्नीक व इतर महाविद्यालयातील प्राध्यापकांना उद्योजकतेबाबत प्रशिक्षण दिले जाईल.
येथे प्रशिक्षण घेतलेले प्राध्यापक आपआपल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. उद्योग खात्याने योजना आखली असून कार्यवाही ईडीसीमार्फत होणार आहे.
‘एंट्रेप्रेनरशिप डेवेलोपमेंट इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया’ (ईडीआयआय) मार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्राचार्यांकडून प्रशिक्षणासाठी प्राध्यापकांची नावे मागविण्यात येतील.
नावे आल्यानंतर विविध तुकड्यांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाईल. ईडीआयआयच्या अहमदाबाद येथील कॅम्पसमध्ये सुरवातीला मार्गदर्शन दिले जाईल.
सर्व प्रथम ५० प्राध्यापकांच्या तुकडीला योजनेची माहिती व उद्देश सांगितला जाईल. तदनंतर ईडीआयआय अहमदाबाद येथे सहा दिवसांचे प्रशिक्षण शिबिर होईल.
वर्षाला ३०० जणांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. स्टार्ट अप्स व इन्कुबेशन सेंटरची माहिती दिली जाईल. तदनंतर ६ महिते ते १ वर्षापर्यंत अधूनमधून कार्यशाळा तसेच प्रशिक्षण शिबिरे होतील.
शेवटच्या टप्प्यात पाच दिवसांचे अत्याधुनिक प्रशिक्षण शिबिर होईल. विद्यालय, महाविद्यालय, रवींद्र भवन व इतर सार्वजनिक ठिकाणी उद्योजकतेबाबत जागृती करणारे कार्यक्रम होतील.
शिक्षण खाते, तांत्रिक शिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण संचालनालय, कुशलता विकास संचालनालयाच्या सहकार्याने प्रशिक्षण शिबिरे होणार आहेत.