सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

नवी दिल्ली : वायू प्रदूषणाशी संबंधित ह्रदय व फुफ्फुसांच्या आजारांच्या वाढत्या प्रकरणांची चाचणी करण्यासाठी सर्व सरकारी हॉस्पिटले (Government Hospitals) व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical colleges) ‘चेस्ट क्लिनिक’ (Chest clinic) स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत (एनपीसीसीएचएच) वायू प्रदूषणाशी निगडीत आजार हाताळण्याचे सूचित करण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), सामुदायिक आरोग्य केंद्रे (CHC), जिल्हा रुग्णालये आणि शहरी भागातील वैद्यकीय महाविद्यालयांसह विविध सरकारी आरोग्य सुविधांमध्ये ‘चेस्ट क्लिनिक’ अनिवार्य करण्यात आले आहे. उच्च वायू प्रदूषण हंगामात (सप्टेंबर ते मार्च) हे क्लिनिक दररोज किमान दोन तासांच्या निश्चित कालावधीसाठी कार्यरत ठेवणे गरजेचे आहे.
यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालायाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना ३३ पानी मार्गदर्शकतत्त्वे पाठवली आहेत. त्यात प्रदूषणामुळे श्वसन व ह्रदय विकाराच्या समस्या वाढल्याने सर्व हॉस्पिटलांनी विशेष तयारी करावी, असे नमूद केले आहे.