बेकायदेशीर 'रेंट-अ-कार'मुळे अपघात आणि गुन्हेगारी वाढली!

भाड्याने दिलेल्या खाजगी गाड्यांवर कारवाई करा; उत्तर गोवा रेंट-अ-कार संघटनेची मागणी

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
13th November, 04:51 pm
बेकायदेशीर 'रेंट-अ-कार'मुळे अपघात आणि गुन्हेगारी वाढली!

पणजी: गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी वाहने बेकायदेशीररित्या 'रेंट-अ-कार' म्हणून भाड्याने चालवल्या जात आहेत. या बेकायदेशीर वाहनांमुळे राज्यात अपघात आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होते, मात्र त्याचा ठपका मात्र रेंट-अ-कार ऑपरेटर्सवर येतो. या खाजगी गाड्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी उत्तर गोवा रेंट-अ-कॅब मालक संघटनेचे अध्यक्ष नितेश चोडणकर यांनी सरकारकडे केली आहे.

खासगी गाड्यांची दादागिरी

या मागणीसाठी रेंट-अ-कॅब संघटनेच्या सदस्यांचे एक शिष्टमंडळ पणजी येथील वाहतूक खाते आणि अंमलबजावणी विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले होते. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना चोडणकर यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले.

चोडणकर म्हणाले की, अनेक टॅक्सीचालक त्यांच्या नंबर प्लेटचे रूपांतर करून त्या रेंट-अ-कार म्हणून भाड्याने देतात, पण त्या कायदेशीर 'रेंट-अ-कार' नसतात. तसेच, अनेक खासगी गाड्या बिनधास्तपणे भाड्याने चालवल्या जात आहेत. सध्या राज्यात दोन हजारहून अधिक खासगी वाहने बेकायदेशीरपणे भाड्याने धावत आहेत.

अपघात वाढले, दोष दुसऱ्यांवर

चोडणकर यांनी आरोप केला की, गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गुन्हेगारी घटना आणि अपघातांमध्ये प्रामुख्याने या खासगी गाड्यांचा समावेश असतो. तरीही, लोक बोट मात्र कायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या रेंट-अ-कार मालकांकडे दाखवतात.

ते म्हणाले की, पोलीस स्थानक स्तरावर नाकाबंदी लावल्यामुळे कळंगुटसह आसपासच्या परिसरात दारू पिऊन गाडी चालवणे आणि भरधाव वेगावर बऱ्याच अंशी नियंत्रण आले आहे. मात्र, खासगी गाड्यांवर कोणतीही कारवाई होत नाही आणि त्या बिनधास्तपणे भाड्याने चालतात. अधिकाऱ्यांनी या विषयावर आपल्या गटासोबत बसून तातडीने कारवाई सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.

हेही वाचा