अरबैल घाटात अपघात; स्पिरिटने भरलेल्या लॉरीची झाडाला धडक

अवघ्या काहीच क्षणात लॉरी भस्मसात, चालकाने उडी मारून वाचवला जीव

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
4 hours ago
अरबैल घाटात अपघात; स्पिरिटने भरलेल्या लॉरीची झाडाला धडक

जोयडा: यल्लापूर तालुक्यातील अरबैल घाटातील मारुती मंदिराजवळ शुक्रवारी उशिरा रात्री एक भीषण अपघात घडला. गोव्यातून स्पिरिट (Spirit) घेऊन केरळकडे निघालेल्या एका लॉरीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती लॉरी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडावर जोरात आदळली. धडकेनंतर काही क्षणांतच लॉरीला भीषण आग लागली आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली.

हा अपघात इतका गंभीर होता की लॉरीतील ज्वलनशील पदार्थांमुळे आग त्वरित पसरली. सुदैवाने, लॉरीचालक आंध्रप्रदेशातील कर्नूल येथील रहिवासी श्रीनिवास रेड्डी याने प्रसंगावधान राखून तत्काळ बाहेर उडी मारली आणि आपला जीव वाचवला.

अपघाताची माहिती मिळताच यल्लापूर पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र लॉरी आणि आतील माल पूर्णपणे नष्ट झाला आहे.

हेही वाचा