मुंबईत १५ कोटींचे कोकेन जप्त : डोंगरी पोलिसांची कारवाई : ‘इथिओपिया’तून आणले होते कोकेन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
मुंबईत १५ कोटींचे कोकेन जप्त : डोंगरी पोलिसांची कारवाई : ‘इथिओपिया’तून आणले होते कोकेन

मुंबई : दक्षिण मुंबईत पोलिसांनी अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. डोंगरी पोलिसांनी (Dongri Police) १५ कोटी रुपये किंमतीचे ३ किलो कोकेन जप्त केले. त्याचबरोबर या प्रकरणात तिघांना चेन्नईच्या तुरुंगातून ताब्यात घेतले आहे.

एनसीबीने (Narcotics Control Bureau (NCB)) त्यांना अटक केली होती. ताब्यात घेतलेले तिघेही आंतरराष्ट्रीय (international drug syndicate)  ड्रग्स तस्करी रॅकेटचे सदस्य असल्याचे पुढे आले आहे.

या तिघांमधील एकाने ‘इथिओपिया’तून (smuggled cocaine from Ethiopia) आणलेले कोकेनने भरलेल्या ‘कॅप्सूल’ दक्षिण मुंबईतील सब‌िना गेस्ट हाऊसच्या खोलीत ठेवले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील ‘सबिना गेस्ट हाऊस’ याठिकाणी थांबलेला व्यक्ती अजून पोलिसांच्या हाती लागलेला नसून, तो बेपत्ता आहे. मात्र, त्याचे काही साहित्य खोलीत सापडले आहे.

या माहितीवरून डोंगरी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोंडुराम बांगर, मिनीनाथ वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी सबिना गेस्ट हाऊसमध्ये खोलीची तपासणी केली. खोलीची संपूर्ण झाडाझडती घेताना त्यांना कॅप्सूल सापडली. कॅप्सूल उघडून पाहिली असता, त्यात कोकेन असल्याचे दिसून आले.

कॅप्सूलमधील कोकेन अमली पदार्थाचे वजन केले असता, ३ किलो असल्याचे व एकूण १५ कोटी रुपये किंमतीचे असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. त्यानंतर डोंगरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, याप्रकरणातील संशयित तरुण कपूर चेन्नईच्या तुरुंगात इतर साथीदारांसोबत असल्याचे समजले.

एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) त्यांना अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघांनाही प्रक्रिया पूर्ण करून मुंबईत आणून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अटक करण्यात आली असून, त्यात तरुण कपूर (२६ वर्षे), हिमांशू शाह (२५ वर्षे) व साहिल अटारी (२५ वर्षे) या तिघांचा समावेश आहे. 


हेही वाचा