मनीषा केतकर खून प्रकरण: पती मनोहर केतकरची जन्मठेपेची शिक्षा रद्द

उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; 'संशयाच्या आधारावर शिक्षा देणे अयोग्य' - न्यायालयाचे स्पष्ट मत

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
15th November, 04:29 pm
मनीषा केतकर खून प्रकरण: पती मनोहर केतकरची जन्मठेपेची शिक्षा रद्द

म्हापसा: लाडफे, डिचोली येथे २०१३ मध्ये झालेल्या पत्नी मनीषा केतकर (वय ४०) हिच्या खून प्रकरणी दोषी ठरवत पती मनोहर लक्ष्मण केतकर (रा. धाटवाडी, कसई-दोडामार्ग) याला म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवली आहे. न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस यांच्या द्विसदस्यीय न्यायपीठाने हा निवाडा दिला.

न्यायालयाने काय म्हटले

आरोपीच्या सहभागाबद्दल संशय निर्माण होतो, पण संशय कितीही मजबूत असला तरी, तो पुराव्याची जागा घेऊ शकत नाही आणि आरोपीला संशयाच्या आधारावर दोषी ठरवता येत नाही. रेकॉर्डवर आणलेली परिस्थिती गुन्ह्याची संपूर्ण घटना उघड करण्यात अपयशी ठरली आहे. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर वाजवी संशयापलीकडे संशयिताचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले पुरावे सरकारी पक्ष स्थापित करण्यात अपयशी ठरला आहे. यामुळे मनोहर केतकर निर्दोष मुक्तता मिळण्यास पात्र आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

तत्काळ सुटकेचे आदेश

मनोहर केतकर हा सध्या जामिनावर आहे. न्यायालयाने त्याचे जामीनपत्र रद्द केले असून, हमीदारालाही सोडण्यात आले आहे. यासोबतच, अपीलकर्त्याने भरलेली दंडाची रक्कम आठ आठवड्यांच्या आत परत करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

मनोहर केतकर यांच्या वतीने ॲड. प्रविण नाईक, ॲड. संकेत म्हांबरे, ॲड. आदित्य टांकसाळी, ॲड. नम्रता शिरोडकर व ॲड. रोलंड फर्नांडिस यांनी, तर सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता शैलेंद्र भोबे यांनी युक्तिवाद केला.

प्रकरण काय ? 

१८ नोव्हेंबर २०१३ साली डिचोलीतील लाडफे येथील एका बागायतीमधील झोपडीत मनिषा केतकर यांचा मृतदेह आढळला. पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून संशयित पतीने तिला घटनेच्या दिवशी गावातून डिचोलीला बोलावले. लाडफे येथे बागायतीत नेऊन खून करण्यापूर्वी त्याने तिच्या डोळ्यात मिरची पूड मारली, हात व तोंड बांधले आणि नंतर दोरीने गळा आवळून डोक्यावर दगड घातला होता.

आरोपीने मुलाला फोन करून आपण आईचा खून केला असून, तिचा मृतदेह लाडफे येथे आहे, अशी माहिती दिली होती. तसेच पत्नीला वाममार्गाला लावणाऱ्या दोघांचा खून करून स्वतःला संपवण्याची धमकीही दिली होती. ११ जानेवारी २०१४ रोजी सुमारे दीड महिने पोलिसांना गुंगारा देऊन दोडामार्गच्या जंगल भागात लपलेल्या संशयित आरोपी मनोहर केतकर यास डिचोली पोलिसांनी दवर्ली-मडगाव येथून अटक केली.

ऑगस्ट २०२४ रोजी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने (न्यायाधीश शर्मिला पाटील) मनोहर केतकर यास खून (भा.दं.सं. ३०२) आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न (भा.दंसं. २०१) या आरोपांखाली दोषी ठरवत जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. आरोपी जानेवारी २०१४ पासून तुरुंगात होता.

हेही वाचा