
मडगाव: विरोधकांची युती व्हावी ही जनतेची मागणी आहे. त्यासाठी विरोधकांतील ज्येष्ठ नेता या नात्याने तिन्ही पक्षांशी चर्चा करत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसशी युती ही २०२२ च्या निवडणूकपूर्व झालेली आहे, ती अमित पाटकर यांच्याकडे पाहून केलेली नाही. हिंमत असल्यास त्यांनी युती तोडण्याची घोषणा करावी, असे गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले.
बिहारात काँग्रेसची अवस्था काय झाली, हे सर्वांसमोर आहे. त्यावर विचारविनिमय करायची वेळ असताना मित्रपक्षाने काढलेल्या व्यक्तीला काँग्रेस पक्षात प्रवेश देते. काँग्रेससोबतच नाही, तर तिसऱ्या पक्षालाही सोबत घेऊन हात वर करत एकजूट दाखवली होती. ही युती होणार की नाही ते माहीत नाही, पण विरोधकांतील ज्येष्ठ नेता या नात्याने सर्वांना एकत्र येण्यासाठी हा प्रयत्न केला. विरोधकांची एकजूट व्हावी, ही लोकांची इच्छा आहे, असेही आमदार सरदेसाई म्हणाले.
राज्यात काँग्रेससोबत २०२२ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि अमित पाटकर हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याचा विचार होण्यापूर्वीच निवडणूकपूर्व युती केलेली आहे. जमीन घोटाळ्याशी संबंधित असल्याचा संशय आल्यामुळे ज्यांना आम्ही पक्षातून सकाळी बाहेर काढले आणि सायंकाळी काँग्रेस त्याला पक्षात घेते, हे पाटकर व सावंत यांच्यात सलगी (जवळीक) असल्याचे दर्शवते. याच निष्कर्षाप्रत आपण आलेलो आहोत, असेही आमदार सरदेसाई यांनी सांगितले.
युती राखण्याचा प्रयत्न, न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत
काँग्रेसने जिल्हा पंचायतीसाठी समिती स्थापन केलेली असून, ती उमेदवारांच्या भेटीगाठी घेणार आहे. निवडणुका जाहीर झालेल्या असून, पुढील महिन्यात निवडणुका होणार आहेत. एक महिनाही उरलेला नसताना काँग्रेस राज्यातील सर्व जागांवर उमेदवारांच्या शोधात आहे. त्यामुळे युती राखण्याचा प्रयत्न असेल आणि ज्या ठिकाणी शक्य नसेल, त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही आमदार सरदेसाई म्हणाले.