आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसची इतर पक्षांसोबत युती करण्याची तयारी

प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार; प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची माहिती, उद्या समितीची बैठक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
51 mins ago
आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसची इतर पक्षांसोबत युती करण्याची तयारी

पणजी: गोव्यात येऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी इतर विरोधी पक्षांसोबत युती करण्याची काँग्रेसची तयारी आहे. मात्र, तसा प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करून पक्षश्रेष्ठी याबाबत अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली आहे.

राज्यात १३ डिसेंबर रोजी जिल्हा पंचायत निवडणूक होणार आहे. आरक्षणाची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या हालचालींनी आता वेग घेतला आहे. येत्या दोन दिवसांत निवडणूक आचारसंहितेची अधिसूचनाही जारी होण्याची शक्यता आहे.

उद्या काँग्रेस समितीची बैठक

आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीची तयारी तसेच उमेदवारांची निवड करण्यासाठी काँग्रेसने एक समिती स्थापन केली आहे. या समितीत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार कार्लूस फेरेरा, गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष एम. के. शेख आणि खासदार विरियातो फर्नांडीस यांचा समावेश आहे.

या समितीची यापूर्वी एक बैठक झाली असून, उद्या, सोमवारी (१७ नोव्हेंबर) दुसरी बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांची निवड करण्यासोबतच युतीच्या संभाव्य प्रस्तावांवर सविस्तर चर्चा होईल, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा