सहकार खात्याने नवीन पारंपरिक पतसंस्थांना परवानगी देऊ नये !

कर्ज बुडवेगिरीला आळा घाण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th November, 11:28 pm
सहकार खात्याने नवीन पारंपरिक पतसंस्थांना परवानगी देऊ नये !

साखळी : कर्जे काढून ती बुडविण्याचे प्रकार वाढल्याने, यापुढे अशा नवीन पारंपरिक सहकारी पतसंस्थांना परवानगी देऊ नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. तसेच, प्रत्येक कर्जधारकाचा प्रधानमंत्री वीमा योजनेतून वीमा करावा, असे आवाहन त्यांनी केले. साखळी रवींद्र भवनात ७२ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

नवीन पारंपरिक पतसंस्थांना परवानगी नाही

सहकारी पतसंस्थांमध्ये कर्जे काढून नंतर ती बुडविणे, अशा प्रकारचे लुटीचे धंदे वाढले आहेत. एकच व्यक्ती आपल्या परिसरातील अनेक सहकारी संस्थांमध्ये कर्जे घेऊन अखेर ती बुडवितो. त्यांची वृत्तीच कर्जे बुडविण्याची असल्याने, आता यापुढे अशा पारंपरिक सहकारी संस्थांना सरकारतर्फे परवानगी मिळणार नाही. सहकार खात्याने यापुढे अशा नवीन पारंपरिक सहकारी पतसंस्थांना परवानगी देऊ नये. उलट प्रत्येक सहकारी पतसंस्थेने प्रधानमंत्री वीमा योजनेतून प्रत्येक कर्जधारकाचा वीमा करावा. सोमवारीच हे परिपत्रक सहकार खात्याने काढावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. साखळी रवींद्र भवनमध्ये गोवा थ्रीफ्ट सहकारी संस्था व इतर विविध सहकारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ७२ वा अखिल भारतीय सहकार सप्ताह २०२५ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर, उपाध्यक्ष कृष्णा कुडणेकर, सहकार खात्याचे निबंधक आशुतोष आपटे, प्रमुख वक्ते म्हणून बुलढाणा सहकारी पतसंस्थेचे सीईओ शिरीष देशपांडे व इतरांची उपस्थिती होती.

केंद्रात स्वतंत्र सहकार खाते!

देशात ७५ वर्षांनंतर प्रथमच सहकार क्षेत्राची प्रगती साधण्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार खाते स्थापन केले असून, त्याचे मंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच आहेत. यावरून सहकार क्षेत्राला देशात उंच पातळीवर नेण्याचा सरकारचा विचार आहे. गोवा सरकारनेही सहकार क्षेत्रात नवनवीन बदल आणण्याचा विचार केला आहे. या क्षेत्रातून गोव्यातील विविध माध्यमांना जोडून त्याचा लाभ लोकांना थेटपणे देण्याचा विचार चालविला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढविताना प्रगती साधण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा.
आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना चालीस लावताना त्यात सहकार क्षेत्राने प्रभावी समावेश दाखविल्यास मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. स्वयंपूर्ण गोव्याचा नारा दिल्यानंतर प्रथमच दसरोत्सवात झेंडू फुलांची बाहेरून आयात ५० टक्क्यांवर आली.
यावरूनच गोव्यातील शेतकरीही शेतात उतरून उत्पादन घ्यायला लागल्याचे दिसून आले. स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेखाली गोव्यात भाजी लागवड, फुल, डेअरी, मासळी उत्पादन भरपूर वाढले आहे.

#GoaNews #PramodSawant #CooperativeSocieties #SwayampurnaGoa #Sankhali