फिडे विश्वकप २०२५ : याकूबबोवची एकमेव विजयी खेळी

पणजी : गोव्यातील रिसॉर्ट रिओ, पणजी येथे सुरू असलेल्या २० लाख डॉलर्स बक्षिसाच्या फिडे विश्वकप २०२५ च्या क्वार्टर फायनल फेरीत भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने उल्लेखनीय खेळी करत चीनी ग्रँडमास्टर वेई यी याला फक्त ३१ चालींमध्ये ड्रॉवर रोखण्यात यश मिळवले. या सामन्याने अर्जुनने केवळ स्वतःची तयारी सिद्ध केली नाही, तर भारतासाठीही महत्त्वाचा दिवस नोंदवला.
या प्रतिष्ठित स्पर्धेचा विजेता नवीन विश्वनाथन आनंद कपच्या अंतिम फेरीत पोहोचेल,
तसेच मार्च २०२६ मध्ये सायप्रस येथे होणाऱ्या कॅंडिडेट्स स्पर्धेत स्थान मिळवेल. म्हणजेच, या स्पर्धेतील प्रत्येक डाव खेळाडूंच्या कारकिर्दीसाठी निर्णायक ठरणारा आहे.
आंध्र प्रदेशातील वारंगलचा २१ वर्षीय ग्रँडमास्टर अर्जुन उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसून आला.
पहिल्या सामन्यात अर्जुनने रे लोपेजवर क्लोज सिस्टीमचा अवलंब केला. या ओपनिंगमध्ये त्याला कोणतीही अडचण आली नाही. उत्कृष्ट तयारी आणि वेळेचे व्यवस्थित नियोजन यामुळे अर्जुनने संपूर्ण डावावर नियंत्रण ठेवले.
सामना २७ व्या चालीतच रूक आणि प्याद्यांच्या समसमान एंडगेममध्ये पोहोचला होता.
त्यानंतर ३० चालींची मर्यादा पार होताच तीन वेळा समान स्थिती पुनरावृत्तीच्या नियमाने खेळाडूंनी ड्रॉ मान्य केला. खेळादरम्यान अर्जुनने अवघ्या सुरुवातीच्या टप्प्यातच वेई यीपेक्षा जास्त वेळ राखून ठेवला.
त्याची ही वेगवान आणि आत्मविश्वासपूर्ण शैली त्याच्या मजबूत तयारीची पावती होती. आता दुसरा क्लासिकल सामना निर्णायक ठरणार असून, त्यात अर्जुनकडे पांढऱ्या मोहऱ्या असण्याचा थेट लाभ आहे.
क्वार्टर फायनलच्या पहिल्या दिवशी एकमेव निर्णायक निकाल नोंदवला तो उझबेकिस्तानच्या नोडिरबेक याकूबबोव याचा. त्याने जर्मनीच्या ग्रँडमास्टर अलेक्झांडर डोनचेंको याला पराभूत केले. इतर सामने कठीण लढतीनंतर झालेले ड्रॉ, सॅम शॅंकलँड विरुद्ध आंद्रे एसिपेंको ड्रॉ (३८ चाली), सिंदारोव जावोखिर विरुद्ध जोस एडुआर्डो मार्टिनेज अलकांतारा ड्रॉ (३९ चाली)
दिवसभरातील सामन्यांचे निकाल
सामना निकाल
अर्जुन एरिगैसी वि. वेई यी ०.५-०.५
सॅम शॅंकलँड वि.आंद्रे एसिपेंको ०.५-०.५
सिंदारोव जावोखिर वि. जोस एडुआर्डो मार्टिनेज अलकांतारा ०.५-०.५
नोडिरबेक याकूबबोव वि.अलेक्झांडर डोनचेंको १-०
सर्वांचे लक्ष दुसऱ्या क्लासिकल सामन्याकडे
दुसरा डाव निर्णायक ठरणार आहे. अर्जुन पांढऱ्या मोहऱ्यांसह अधिक आक्रमक रणनीती वापरू शकताे आणि त्याचा वर्तमान फॉर्म पाहता त्यांच्याकडून विजयाची अपेक्षा वाढली आहे.